काँग्रेसच्या तासवडे टोलनाक्यावरील टोलविरोधी आंदोलनाला यश; 100 टक्के टोल माफीचे NHAI कडून पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडेतील टोलनाक्यावर आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी पावणेतीन वाजेपर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनास यश मिळाले आहे. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीकडून तासवडे टोलनाका परिसरातील 20 किलोमीटर अंतरातील सर्व गावांना 100 टक्के टोल माफी करण्यात आली असून तासवडे टोलनाक्यावरून जाणाऱ्या देशभरातील सर्व वाहनांना 25 टक्के टोल माफी जाहीर केली आहे. त्याचबरोबर आणखी 25 टक्के टोल माफी मिळावी यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तासवडे टोलनाक्यावर आज करण्यात आलेल्या आंदोलनास आमदार विश्वजीत कदम यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर सुमारे साडेपाच तास आंदोलन करत वाहने विना टोलची सोडून देण्यात आली.

विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी दहा वाजल्यापासून तासवडे टोल नाका परिसरात स्वतः ठाण मांडून साडेपाच तास आंदोलन केले. यावेळी जोपर्यंत तोल माफीचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन केले. यावेळी महामार्ग प्राधिकरणाकडून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना लेखी आश्वासन देण्यात आले आणि त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

अशी मिळालीय टोलमध्ये सवलत

तासवडे टोलनाका परिसरातील 20 किलोमीटर अंतरातील सर्व गावांना टोल सवलत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कराड तालुक्यातील उंडाळे विभागातील गावे वगळता अन्य 20 किलोमीटर अंतरातील सर्व गावांना फायदा झाला आहे. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील काही गावांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे. 20 किलोमीटर अंतरातील गावातील लोकांना टोल नाक्यावरून पास काढावे लागणार आहेत. त्याचबरोबर तासवडे टोलनाक्यावरून जाणाऱ्या देशभरातील सर्व वाहनांना 25 टक्के टोल माफी जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी मान्य झालेल्या मागण्या –

1) पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत टोल मध्ये ५० टक्के सूट मिळावी ही काँग्रेसची मागणी होती. आजपासून प्राधिकरणाने २५ टक्के सूट देण्याचे मान्य केले व उर्वरित २५ टक्के सूट हायवेच्या वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्रीय मंत्री स्तरावर चर्चा करून पुढील आठवड्यात निर्णय घेण्यातयेईल असे आश्वासन दिले आहे.

2) तसेच टोलनाका परिसरातील २० किमी च्या परिघातील स्थानिक वाहनांना टोल माफ करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक विचार होऊन आजपासून टोलच्या २० की. मी. अंतरातील वाहनांना टोल माफ करण्याचे मान्य केले आहे.

पोलिसांकडून आंदोलक ताब्यात नंतर सुटका

टोलमाफीच्या मागणीसाठी तीन तास आंदोलन केल्यानंतरही मागणी मान्य होत नसल्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत महामार्गावर वाहने अडविली होती. यावेळी काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.