खंडाळा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ; सत्ताधारी-विरोधक एकमेकांना भिडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | “आमचा कारखाना आम्हाला कधी मिळणार?”, असा सवाल उपस्थित करीत विरोधकांनी सत्ताधारी गटाला खंडाळा साखर कारखान्याच्या भागीदारी कराराची मुदत १८ वर्षाने वाढवल्याने वार्षिक सभेत धारेवर धरले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांची खडाजंगी झाली. दरम्यान “खंडाळा कारखान्यावरील कर्ज ज्या दिवशी फिटेल त्याच दिवशी हा करार संपुष्टात येईल”, असे सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर देखील गोंधळ कायम राहिला.

खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष व्ही. जी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी किसन वीरचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, दत्ता ढमाळ, नितीन भरगुडे-पाटील, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, भाजप तालुकाध्यक्ष अनिरुद्ध गाढवे, डॉ. नितीन सावंत, बंडू ढमाळ यासह संचालक उपस्थित होते.

विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी करू नये. भागीदारी ठरावावर सभासदांमधून मतदानाची प्रक्रिया राबवावी व मगच हा निर्णय घ्यावा, अशी मागणी अनिरुद्ध गाढवे यांनी केली. कारखाना उभारताना सभासद संचालकांनी स्वतःच्या सातबाऱ्यावर कर्ज काढून रक्कम उभी केली. ही रक्कम तत्काळ भरून या सभासदांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी माजी संचालक धनाजी डेरे यांनी केली. तर ठेवपावतीचे ९४ लाख रुपये बँक खात्यावर जमा नाहीत त्याचे काय झाले? त्याचा हिशोब लागत नसेल तर संचालक मंडळाची चौकशी करावी अशी मागणी डॉ. सावंत यांनी केली.

तर कारखाना तालुक्याच्या ताब्यात दिला जाईल : खासदार नितीन पाटील

यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत खासदार नितीन पाटील म्हणाले, ‘कारखाना उभारताना अवास्तव खर्च केल्यानेच किसन वीर कारखाना कर्जबाजारी झाला. परंतु राजकीय कारकीर्द पणाला लावून कारखाना वाचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. ज्या दिवशी थकहमीचे कर्ज फिटेल, त्या दिवशी कारखाना तालुक्याच्या ताब्यात दिला जाईल.