‘ऑगस्ट क्रांती’चा इतिहास 80 वर्षानंतरही जिवंत! साताऱ्याच्या कॉम्रेड दादू रमजूंनी केलं होतं चित्रिकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आजचा दिवस हा जगभरात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजी यांनी काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा दिला आणि 9 ऑगस्ट रोजी क्रांतीचा वणवा पेटला. ब्रिटीशांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार करत नेत्यांची धरपकड केली. त्या ऑगस्ट क्रांतीला आज 81 वर्षे पूर्ण होत आहेत. ऑगस्ट क्रांतीच्या सर्व प्रसंगाचे साक्षीदार हे सातार्‍यातील कॉम्रेड दादू रमजू होते. कारण त्यांनी त्याकाळी त्यांच्या कॅमेऱ्यातून चित्रीकरण केले होते. त्यांच्या चित्रीकरणामुळे क्रांतीचा इतिहास आजही जिवंत आहे.

वास्तविक ज्यावेळी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 9 ऑगस्ट 1942 चे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ब्रिटिशांकडून कार्यकर्त्यांवर लाठीमार करत नेते मंडळींची धरपकड करण्यात आली. तसेच जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराची नळकांडी फोडण्यात आली. त्या आंदोलनावेळी सातार्‍यातील हौशी छायाचित्रकार आणि कम्युनिस्ट कार्यकर्ता दादू रमजू हे त्यांच्या सहकार्‍यांसह उपस्थित होते. गवालिया टँक मैदानावरील त्या सर्व घटनांची त्यांनी छायाचित्रे काढली. तसेच सहकार्‍यांच्या मदतीने मूव्ही कॅमेर्‍याने सर्व प्रसंगांचे चित्रिकरण देखील केले. त्यांनी चित्रिकरण केल्यामुळेच ऑगस्ट क्रांतीचा इतिहास चित्रफीतीच्या रूपाने आजही जिवंत आहे. हा सर्व इतिहास जिवंत ठेवणारे दादू रमजू मात्र आज हयात नाहीत.

9 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी आक्रमक झालेल्या ब्रिटिशांनी कॅमेरा जप्त केला होता. याबाबत कॉम्रेड दादू रमजू यांचे धाकटे बंधू आणि सातार्‍यातील ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार एम. रमजू यांनी त्याकाळातील आठवण नुकतीच बोलून दाखवली आहे. ते म्हणाले की, गवालिया टँक मैदानावरील एका झाडाच्या आडून कॉम्रेड दादू रमजू हे चित्रिकरण करत असताना ब्रिटिश सैनिकाने पकडून त्यांना अधिकार्‍यासमोर उभे केले. कॅमेर्‍यातील रोल काढून द्यायला सांगून अधिकार्‍याने दादू रमजू आणि त्यांच्या एका सहकार्‍याकडून कॅमेरा काढून घेतला. त्यानंतर दोघांनी (टाइम्स ऑफ इंडियाच्या) एका पत्रकाराला मध्यस्थी घालून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची प्रत्यक्ष भेट घेऊन कॅमेरा परत देण्याची विनंती केली होती.

August Revolution Day

आंदोलनातील चित्रिकरणाचा रोलमध्ये होती ‘हि’ महत्वाची माहिती

आंदोलन सुरु असताना ब्रिटिशांनी कॅमेरा जप्त केला मात्र, तो कॅमेरा ब्रिटिश सैनिकांना ऑपरेट करता येत नव्हता. म्हणून कॅमेर्‍यात असलेला रोल काढून अधिकाऱ्याने त्यांच्याबरोबर दोन पोलीस शिपाई पाठवले. ते रोल टाइम्स ऑफ इंडियाच्या डार्क रूममध्ये नेऊन धुतले गेले आणि कॅमेरा पुन्हा कॉम्रेड रमजू यांना देण्यात आला. विशेष म्हणजे ब्रिटिश अधिकार्‍याने कॅमेरा जप्त करण्यापूर्वी दादू रमजूंनी एका रोलचा वापर केला होता आणि तो रोल कॅमेर्‍यातून काढून खिशात ठेवला होता. त्या रोलमध्ये व्यवस्थित चित्रीकरण झाले होते. त्या रोलमुळेच ऑगस्ट क्रांतीच्या प्रसंगांचे चित्रिकरण आजही आपल्याला उपलब्ध होऊ शकते.

August Karnti Din1

ऑगस्ट क्रांतीच्या चित्रिकरणाचे रोल अजूनही उपलब्ध

साताऱ्याचे काँम्रेड दादू रमजू यांच्या कॅमेर्‍यातील दुसर्‍या रोलमध्ये जे चित्रिकरण होते, ते त्या ब्रिटिश अधिकार्‍याने इंग्लडमध्ये त्याच्या संग्रही ठेवलेले होते. ते देखील भारत सरकारला उपलब्ध झाले असल्याची माहिती समोर आली होती. याशिवाय कॉम्रेड दादू रमजू यांच्याकडील चित्रिकरण त्यांचे छायाचित्रकार बंधू एम. रमजू यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर आणले. सातार्‍यातील छायाचित्रकार दिवंगत दत्ता भिडे तसेच दिलीप आंबेकर यांच्या मदतीने मुव्ही कॅमेर्‍यातील फोटो आणि फिल्मच्या आधारे स्लाईड शो तयार केला.

August Revolution Day

ऑगस्ट क्रांतिदिन आंदोलनाच्या चित्रीकरणाच्या DVD ‘या’ ठिकाणी अजूनही सुस्थितीत

ज्यावेळी चित्रिकरणाच्या स्लाईड शो मधील स्लाईड्स खराब होऊ लागल्या. तसेच स्लाईड शो दाखवणे मुश्किलीचे बनले त्यावेळी ते बंद करण्याचा निर्णय घेतला. म्हणून सातार्‍यातील संगणक तज्ज्ञ व छायाचित्रकार सुधीर सुकाळे व केतन हेंद्रे यांनी त्या स्लाईडसचे व्हिडिओमध्ये रूपांतर केले. त्याची डीव्हीडी देखील काढली. कॉम्रेड दादू रमजूंचे बंधू छायाचित्रकार एम. रमजू यांनी त्या व्हिडिओच्या दोन वेगवेगळ्या डिव्हिडी काढून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या वाळवा येथील स्मारक भवनात आणि कुंडल येथील क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड स्मारकात ठेवल्या आहेत.