महावितरण विरोधात हरित न्यायालयात तक्रार; झाडाणीतील जमीन खरेदीत पर्यावरणीय कायद्याचे उल्लंघन

0
95

सातारा प्रतिनिधी | झाडाणी येथील जमीन खरेदी तसेच विकसन प्रकरणाची हरित न्‍यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी कमाल जमीन धारणा कायदा उल्‍लंघनाची चौकशीसाठी अधिकारी नेमण्‍यात आला असून, याच प्रकरणात हरित न्‍यायालयात महावितरणविरोधातही तक्रार करण्‍यात आल्‍याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येते. येथे बेकायदेशीररीत्या जमीन खरेदी करून त्याठिकाणी पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने स्वतःहून दखल घेत याचिका दाखल करत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली.

तसेच बेकायदेशीररीत्या जमीन खरेदी करणारे गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी व इतरांना अनधिकृत वीजजोड दिल्‍याचे समोर आले आहे. या प्रकरणाची हरित न्‍यायालयाने देखील दखल घेतली आहे.

येथील अनधिकृत कामे तसेच वीज जोडणीबाबतही काही कागदपत्रे सादर करण्‍यात आल्‍याची माहिती मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. बांधकाम करण्याची परवानगी नसताना देखील बेकायदेशीररीत्या वीज जोड दिल्‍याचे तसेच त्‍यासाठी झाडे तोडली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.