सातारा प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यापासून आदर्श आचारसंहिता देशभरात लागू झाली आहे. या काळात भरारी पथके, स्थिर संनिरीक्षण चमू किंवा पोलीस अधिकार्यांनी जप्त केलेल्या रोख रकमांबाबत जनतेची आणि प्रामणिक व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तीन अधिकार्यांची समिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गठीत केली आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (जिल्हा परिषद) प्रकल्प संचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि जिल्हा कोषागार अधिकारी यांचा या समितीत समावेश आहे. पोलीस किंवा स्थिर संनिरीक्षण चमू किंवा भरारी पथकाने जप्त केलेल्या रकमांमध्ये प्रत्येक प्रकरणाची ही समिती स्वतःहून तपासणी करेल. अशा जप्तीबाबत प्रथम माहिती अहवाल अथवा तक्रार दाखल झाली नसेल असे किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीनुसार जप्त केलेल्या रकमेचा उमदेवारांशी किंवा राजकीय पक्षाशी किंवा निवडणूक प्रचाराशी संबध नसल्याचे दिसून आल्यास, अशी रोख रक्क्म ज्यांच्याकडून जप्त करण्यात येईल
व्यक्तींना परत देण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर, ती रक्कम तात्काळ परत करण्यासाठी ही समिती उपाययोजना करेल. ही समिती अशा सर्व प्रकरणांचा विचार करून, जप्तीबाबत निर्णय घेईल. पोलीस किंवा स्थिर संनिरीक्षण चमू किंवा भरारी पथकाने जप्त केलेल्या रकमांसंबंधी तक्रारींच्या निराकरणासाठी नागरिकांनी जिल्हा कोषागार अधिकारी येथे अपील करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.