सातारा प्रतिनिधी । शिवप्रभूंचे राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला मानाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ आणि ‘शिवसन्मान पत्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित करण्यात आला आहे. साताऱ्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची आढावा व तयारी बैठक पार पडली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्याना दिल्या. या कार्यक्रमाचा व पुरस्कार सोहळ्याचा नियोजनाचा अहवाल काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. दि. 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या शिवसन्मान पुरस्कार सोहळ्याच्या साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावरील ठिकाणाची खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली होती.