सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा या मुख्य उद्देशाने विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे; यात्रेचा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, संकल्प यात्रेच्या निमित्ताने विविध योजनांची माहिती सांगणारे चित्ररथ गावांमधे जनजागृती करत आहेत. कार्यक्रमाच्या दिवशी त्या गावात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये गावातील जास्तीत जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी करावी आयुष्यमान भारत योजना कार्ड तसेच विविध दाखल्यांचे वाटप करावे.
विकसित भारत संकल्प यात्रा जाणाऱ्या गावांमध्ये तेथे बँकांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा. विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात यशस्वी होण्यासाठी तयार केलेल्या आराखड्यानुसार तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी काम करावे. प्रत्येक गावत होणाऱ्या यात्रेमध्ये तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून तसा अहवाल सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.
विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांचा समन्वय अधिक महत्वाचा आहे. यात्रेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ द्या, असे मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी यावेळी सांगितले.