संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गावरील मटण, बिअर बार बंद करा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून दि. १८ ते २३ जून या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. या सहा दिवसांमध्ये पालखी सोहळ्याच्या मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील पालखी मार्गावरील सर्व मटण, बिअर बार व मद्य विक्री केंद्रे पालखी कालावधीत बंद ठेवण्याबाबत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कार्यवाही करावी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सर्व निवासी डॉक्टर यांच्या चोवीस तास कालावधीसाठी नेमणुका कराव्यात, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बैठकीवेळी म्हंटले.

सातारा येथे नुकतीच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डुडी म्हणाले, ‘‘मॉन्सूनला अद्याप सुरुवात झाली नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व त्या स्त्रोतातून दिवसाकाठी किती टँकर भरले जाऊ शकतात, तसेच पालखी मार्गाच्या शेजारील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत आहेत का?, याची खात्री संबंधित विभागणी करावी. त्याचप्रमाणे पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पालखी तळ, विसावा, सुलभ शौचालय, हिरकणी कक्ष, गॅस सिलिंडर वाटप, पिण्याचे पाणी, स्नानगृह इत्यादीबाबत माहिती दर्शविणारा नकाशा ठिकठिकाणी लावावा. जेणेकरून वारकऱ्यांना माहिती मिळेल.

यावेळी पायी वारी सोहळ्यामध्ये पॅकबंद पाण्याच्या बॉटल्यांची विक्री करण्यात येते. हे पाणी पिण्यायोग्य आहे का?, याची खातरजमा करावी. पालखी कालावधीत मार्गावर व तळावर वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी.’अशा सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी केल्या.