जिल्ह्याधिकारी डुडींच्या पाणी सोडण्याबाबत सूचना; सांगलीसह कराड तालुक्यातील ‘या’ गावाचा पाणी प्रश्न लागणार मार्गी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कृष्णा कालव्यात पाणी सोडण्याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र पाठविले होते. त्यांच्या पत्रातील मागणीनुसार जिल्हाधिकारी डुडी यांनी तारळी धरणातून कृष्णा कालव्यात एक टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज, कराड तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे.

सातारा जिल्हाधिकारी डुडी यांनी सातारा जलसंपदा विभागाला तारळी धरणातून पाणी सोडण्याबाबत सूचना केली आहे. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, तासगाव व मिरज तालुक्यातील १३ हजार ३६६ हेक्टर क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने या भागातील शेती धोक्यात आली आहे. पाण्याअभावी सध्या ऊस, द्राक्ष, केळी, भाजीपाला, फुले व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
पाटबंधारे विभागातील राजकीय हस्तक्षेप थांबून कोर्टाच्या आदेशप्रमाणे कृष्णा कालव्यावर आरक्षित असलेले २.७० टीएमसी पाणी नियमित फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आवर्तन सुरळीत सुरू व्हावे, अन्यथा अजूनही भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात काय म्हंटलं आहे?

सर्व शेतकऱ्यांचा दृष्टीने कृष्णा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र, सातारा जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे कृष्णा कालव्यात पाणी सोडले जात नव्हते. म्हणून शेतकरी आक्रमक झाले होते. याची गंभीर दखल घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे तारळी धरणातून कृष्णा कालव्यात रब्बी हंगामासाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे एक टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे.

सांगलीच्या ‘या’ आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते निवेदन

टंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार सुमनताई आर. आर. पाटील, आमदार मानसिंग नाईक आणि आमदार अरुण लाड यांनी केली आहे. यासंदर्भात या आमदारांनी काल सोमवारी जिल्हाधिकारी एम. राजा दयानिधी यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन दिले होते.