महाबळेश्वरमध्ये नव्याने बांधकाम झाल्यास कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वरमधील जुन्या अनाधिकृत बांधकामांबाबत राज्य शासन निर्णय घेईल, पण त्याठिकाणी नव्याने बांधकाम होत असेल तर कारवाई करणार, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाबळेश्वर व कास अनाधिकृत बांधकामांबाबत विचारले असता जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामांवर पूर्वी कारवाई केली आहे. उर्वरित बेकायदा बांधकामांवरही कारवाई केली जाणार आहे. संबंधित लोकांनी स्वत:हून बेकायदा बांधकामे काढून घ्यावीत अशी विनंती आहे. जुन्या बांधकामांबाबत राज्य शासन निर्णण घेईल.

अनाधिकृत बांधकाम सील केले तर छुप्या पध्दतीने त्याठिकाणी पुन्हा बांधकाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नव्याने बांधकामे सुरु असतील तर ती पाडली जातील. यापूर्वी कुणी काय कारवाई केली याच्याशी काही देणेघेणे नाही. चुकीचे असेल तिथे दबावाला बळी न पडता कारवाई केली जाईल.

शासन चांगले काम करणार्‍यांच्या नेहमीच पाठिशी राहते. कास अनाधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी संबंधितांना मुदत दिली होती. मात्र त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने सांगत सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांना कास अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, कराड प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे पाटण प्रांताधिकारी सुनील गाडे व अन्य उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी उपस्थित होते.