जनसुरक्षा अभियानांतर्गत नागरिकांना विमा सुरक्षा द्या : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष जनसुरक्षा मेळावा आयोजित करुन सर्व लोकांना या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनांमध्ये समाविष्ट करण्याचे काम सुरु आहे. जनसुरक्षा अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी नागरिकांना विमा सुरक्षा द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत तालुका निहाय व गाव निहाय कार्यपुर्तीचा आढावा घेण्यासंदर्भात नुकतीच एक आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, या अभियानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची विविध माध्यमांचा वापर करुन जनजागृती अधिकाऱ्यांनी वाढवावी. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना या योजनेत सहभागी करुन घ्यावा.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बचत गटातील 100 टक्के महिलांना या मोहिमेंतर्गत सामावून घेण्याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महिला आर्थिक विकास महामंडळाला सूचना केल्या. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व बँक शाखांच्या व बँक मित्राच्या मार्फत होणारे ग्रामपंचायत स्तरावरील शिबीर यशस्वी होण्यासाठी त्या-त्या विभागांनी सहकार्य करावे, अशा सूचना दिल्या.

सातारा जिल्ह्याजील अनेक लोक अजूनही योजनेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. या सर्वांच्या सहभागाकरिता बँकांद्वारे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष जनसुरक्षा मेळावा आयोजित करुन सर्व लोकांना या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनांमध्ये समाविष्ट करण्याचे काम सुरु आहे. पंतप्रधान यांनी सन 2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना या दोन विमा योजनांची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत 436 व 20 रुपयाच्या वार्षिक प्रीमियम मध्ये 2 लाखापर्यंतचा विमा प्रदान केला जातो. या योजनांचा गोरगरीब व तळागाळातील लोकांना योजनेमध्ये खूप मोठा लाभ मिळत असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.