सातारा प्रतिनिधी । ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने दि. 23 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 22 गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जनतेला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आणि संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या आहेत.
विकसित भारत संकल्प यात्रा कामकाजाविषयी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी पुढे म्हणाले, ”विविध शासकीय योजनांची माहिती देणारे चित्ररथ गावांमध्ये जनजागृती करत आहेत. संबंधित यंत्रणेने कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन आवश्यक दाखले द्यावेत. आरोग्य शिबिरे घेण्यात यावीत. संबंधित विभागाने लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची माहिती व्हिडिओ पोर्टलला अपलोड करा. ‘आयुष्मान भारत’ योजना राबवण्यात सातारा जिल्हा अग्रेसर असून या कामाला पुन्हा गती द्यायला हवी. यासाठी महिला बचत गटांचेही साहाय्य घेऊ शकतो.”