विकासकामे गुणवत्तापुर्ण होण्यासाठी नवीन तयार केलेली ई प्रणाली उपयुक्त : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामांची अद्यावत प्रगतीची तसेच पूर्ण झालेली कामे ही ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे गुणवत्तापूर्ण व वेळेत झाली असल्याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गुणवत्तापूर्ण काम सनियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली विकास कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहूउद्देशिय सभागृहात बांधकाम स्वरुपाच्या कामावर संनियत्रण ठेवण्यासाठीच्या ई प्रणालीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता श्री. अहिरे, व श्री मोदी, टेकएसपी सोल्युशन्सचे सचिन खराडे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, जिल्ह्यात होणाऱ्या सर्व विभागाकडील सर्वच विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करुन गुणवत्तेची शहानिशा करणे प्रशासनाला तसेच विभागप्रमुखांना शक्य नसते. विकास कामे ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे गुणवत्तापूर्ण व वेळेत होणे सोपे व्हावे यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली पोर्टल व ॲपद्वारे चालणार असून केंव्हाही कामाची तपासणी करणे याप्रणालीद्वारे शक्य होणार आहे. यात मंजूर काम कोणत्या वर्षातील आहे, कामाची रक्कम, त्यांच्या प्रशासकीय मान्यता आहे की नाही, काम सुरु करण्यासाठी आदेश केंव्हा निर्गमित करण्यात आली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले, वेगवेगळ्या विभागाची कामे होत असताना काम चांगले होण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि नागरिकांकडून पाठपुरावा होत असतो. काम पूर्ण झाल्यानंतर कामाबाबत तक्रारी प्राप्त होतात, कामे समाधानकारक न झाल्याने शासनाचे झालेले नुकसान भरुन काढता येत नाही. यासाठी कामे गुणवत्तापुरक होऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या प्रणालीचा अत्यंत चांगल्या पध्दतीने वापर होईल.