पुढील वर्षातील संभाव्य टंचाई रोखण्यासाठी आत्तापासूनच उपाय योजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुढील वर्षातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा, पाटबंधारेच्या प्रकल्पांची दुरुस्ती करावी. तसेच पाणी, चारा टंचाई संदर्भातील सर्व बाबींचा आराखडा तयार करुन आत्तापासूनच उपाययोजना सुरु करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात टंचाई आज पाणी, चारा टंचाईबाबत आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत उपवनसंरक्षक आदिती भारद्वाजत, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्याकरी अधिकारी महादेव घुले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया पाटील,जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, जिल्ह्यात पशुधनाला मार्चपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. जुलै 2024 पर्यंत चाऱ्याचे नियोजन करा. यासाठी कृषि विभागाने गावांमधीली जमिनी शोधण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही चारा उत्पादन करण्यासाठी प्रवृत्त करुन चारा लागवडीचे प्रमाण वाढवावे. यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यांना सर्व सहकार्य करावे. निधीही उपलब्ध करुन दिला जाईल. या कामासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी.

प्रत्येक गावात लोकसहभागातून 10 वनराई बंधारे उभारले जाणार

प्रत्येक गावामध्ये लोकसहभागातून कमीत कमी 10 वनराई बंधारे बांधावेत. बंधाऱ्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास खूप मदत होते. याकामासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व स्वयंवेसवकांची मदत घ्यावी. वनराई बंधाऱ्याबाबत सरपंच, उपसरपंच यांच्यासाठी ऑनलाई कार्यशाळेचे आयोजन करावे. वनराई बंधारे उभारणीसाठी बांधकाम विभागाची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डूडी यांनी केल्या.

जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत 186 गावांमध्ये पुन्हा सुरु होणार काम

सातारा जिल्ह्यात सुरु असलेली जल जीवन मिशनची कामेही मिशनमोड पूर्ण करण्याबरोबरच जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत 186 गावांमध्ये काम करण्यात येणार आहे. या कामांची प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर घेऊन ही कामे सुरु करावीत. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत कोयना धरणातील पाणी जस जसे कमी होईल तस तसा गाळ काढण्याचे काम सुरु करावे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांमधील गाळ काढण्याचे नियोजनही करावे. यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत टंचाई संदर्भात जी कामे सुरु आहेत ती ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डूडी यांनी दिले.

विभागांनी बांबु लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा : जिल्हाधिकारी डूडी

27 हजार हेक्टरवर बांबु लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या नुसार विभागांनी लागवडीचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजुर करुन प्रशासकीय मान्यता घेऊन प्रत्यक्ष बांबु लागवडीचे काम सुरु करावे. लागवडीसाठी वृक्ष गावापर्यंत पोहविण्यात येतील. ऑक्टोंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात बांबु लागवड होईल या दृष्टीने काम करावे. यबाबात वेळोवेळी आढावाही घेतला जाईल, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.