15 ऑगस्ट दिवशी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणादिवशी, 1 मे महाराष्ट्र दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. शालेय विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात. परंतू हे ध्वज त्याच दिवशी सायंकाळी अथवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे कागदी व प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हावासियांना आज रविवारी एक महत्वाचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, यावर्षी मंगळवार, दि. 15 ऑगस्टला भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर कागदी व प्लॅस्टीकचे राष्ट्रध्वजाचा प्रत्येकाने सन्मान राखला पाहिजे. त्यासाठी कोणीही राष्ट्रध्वज इतरत्र टाकू नयेत. राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा.

तसेच सर्व नागरिक, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था, शासकीय समित्या यांनीही इतरत्र पडलेले, खराब झालेले व फाटलेले राष्ट्रध्वज संकलित करावेत. तसेच कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने स्वतःहून गोळा केलेले राष्ट्रध्वज शासकीय समित्यांकडे द्यावेत. त्यांनी ते स्वीकारुन खराब व फाटलेल्या राष्ट्रध्वजांची विल्हेवाट ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.