सातारा प्रतिनिधी । सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात नुकतीच ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरात जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच आघाडीवर राहिले असून त्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचे काम कृषी विभागाने करावे; त्यांनी नैसर्गिकरित्या उत्पादित केलेल्या कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली.
यावेळी कार्यशाळेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक विकास बंडगर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, नैसर्गिक शेती पद्धतीचे तंत्रज्ञान कृषी विभागाकडे आहे. या कार्यशाळेस नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ वक्ते संग्राम पाटील, सुजीत पाटील, आनंत गव्हाणे, स्वाती गुरव, कृषी विभागातील अधिकारी, आदी उपस्थित होते.
हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे. नैसर्गिक शेतीसाठी प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करण्यासह गट शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणावे. शासनाने येत्या ३ वर्षात २२ हजार हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट सहजपणे पूर्ण करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करु, असेही ते म्हणाले.
यावेळी डूडी म्हणाले की, मुंबई, पुणे येथे नैसर्गिकरित्या उत्पादित कृषी उत्पादनांना मोठी मागणी असून दरही चांगले मिळत आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याचे फायदे सांगावेत. सातारा जिल्हा नैसर्गिक शेतीमध्ये क्रांती निर्माण करुन देशात आदर्श प्रस्थापित करील
भाग्यश्री फरांदे म्हणाल्या की, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी कृषी विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. प्रत्येक तालुक्यात नैसर्गिक शेतीबाबत कार्यशाळा आयोजित करुन नैसर्गिक शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.