पाणी टंचाईग्रस्त भागात तातडीने उपाययोजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत खंडाळा, पाटण, जावली, महाबळेश्वर, सातारा या पाच तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. तसेच माण, खटाव, फलटण, कोरगाव, वाई, कराड या सहा तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. या गावात विहीर अधिग्रहण करण्याच्या अधिकाराला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यानी कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आज दिल्या.

जिल्ह्यातील पाणी टंचाई स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे तहसीलदारांची आढावा बैठक घेतली. यावेळी बैठकीत कमी प्रमाणात पाऊस झालेल्या तालुक्यामध्ये उपाययोजना करणेचे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

बैठकीत जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, पाणीटंचाई संदर्भात सर्व तालुक्यांनी आराखडे यापूर्वी सादर केले आहेत. आराखडयातील गावांव्यतिरिक्त ज्या गावांची नव्याने मागणी येत आहे, त्यांचा समावेश आराखड्यात करून सदरचे पुरवणी आराखडे तातडीने जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यालयाकडे सादर करावेत. विहीर अधिग्रहण, टँकर या बाबींचा प्रामुख्याने समावेश करावा. तसेच सदरचे आराखडे सादर करताना संबंधीत मंडळामध्ये किती टक्के पाऊस झाला आहे, या बाबतचा अहवाल संलग्न करावा.

ज्या ठिकाणी शासकीय टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो तेथील डिझेलची देयके तातडीने जिल्हा परिषदेकडे सादर करावीत. सदरच्या देयकांना त्वरीत निधी उपलब्ध करून दिला जाईल. डिझेल विना गावांना टॅकर मिळत नाही अशी परिस्थिती कोठेही उद्भवू नये याबाबतची सर्वानी दक्षता घ्यावी. अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही डिझेल निधीची मागणी पाठविण्याबाबत यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी सूचित केले.

ज्या तालुक्यामधे उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याबाबत मागणी होत आहे, त्यांनी सदर प्रस्ताव सातारा सिंचन मंडळाकडे तातडीने सादर करावेत. त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. तसेच ज्या तालुक्यातील पाझर तलाव, पाणीसाठे या ठिकाणी गाळमुक्तचे काम सुरु करता येणे शक्य असेल त्या ठिकाणी ते सुरु करावे. यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेऊन अथवा जे खाजगी शेतकरी स्वतः गाळ उपसण्यास इच्छुक असतील त्यांना सेवाभावी संस्था गृहीत धरून त्या बाबत प्रस्ताव तातडीने मृद व जलसंधारण विभागाला पाठवावेत व सदरीची कामे सुरु करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही करावी.

कृषी विभागाचा घेतला आढावा

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडील अहवालाप्रमाणे सातारा जिल्हयामध्ये खरीप हंगामामध्ये प्रत्यक्ष पेरणी 1,45,292/- हेक्टर एवढ्या क्षेत्रावर करणेत आली आहे. त्यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तृणधान्य व तुर, मुग, उडीद इ. कडधान्य तसेच भुईमुग तिळ कारळे सोयाबीन इ. गळीत धान्य तसेच कापूस या पिकांचा समावेश आहे. दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत होणा-या सरासरी खरीप पेरणीच्या प्रमाणात आज अखेर झालेली पेरणी केवळ 50 टक्केच आहे. त्यामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी उपाययोजनात्मक कार्यवाही सुरु करण्याबाबत सूचना यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी दिल्या.

टँकर सुरू असणाऱ्या गावात विहीर अधिग्रहणबाबत सूचना

सद्यस्थितीत माण तालुक्यात 38 गावे व त्या अतर्गत 255 वाड्या-वस्त्यामध्ये 40 टँकर चालू आहेत. तसेच 3 विहीरी व 10 विंधनविहीरी आल्या आहेत. खटाव तालुक्यामध्ये 2 गावांमध्ये 2 टॅंकर चालू आहेत. तसेच 5 विहीरी व 14 विधनविहीरी अधिग्रहण करणेत आल्या आहेत. कराड तालुक्यामध्ये 5 गावामध्ये 3 टैंकर चालू आहेत तसेच 6 विहीरी व 2 विंधन विहीरी अधिग्रहण करणेत आल्या आहेत. कोरेगाव तालुक्यामध्ये ३ गावासाठी 2 टॅंकर चालू आहेत. तसेच ५ विहीरी व विधनविहीर अधिग्रहण करणेत आली आहे. फलटण तालुक्यामध्ये २ गावे व 15 वाड्यावस्त्यामध्ये ४ टॅंकर चालू आहेत. तसेच 1 विहीर अधिग्रहण करणेत आली आहे. वाई तालुक्यामध्ये 6 गावे व वाड्यावस्त्यामध्ये टँकर चालू आहेत. तसेच ८ विहीर अधिग्रहण करणेत आली आहे.