प्लॅस्टिकसह खराब झालेलया राष्ट्रध्वजबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून सर्व राष्ट्रीय कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दिवशी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यास बंदी आहे. 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनी प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर इतर ठिकाणी पडलेले खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तहसील वा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

गृह विभागाच्या वतीने दि. 1 जानेवारी 2015 रोजी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध जारी करण्यात आले आहे. प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून प्लॅस्टिकच्या व कागदाच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले, खराब झालेले, माती लागलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात.

असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहिता 2002 व राष्ट्रीय अवमान कायदा 1971 मध्ये तरतूद केलेली आहे. रस्त्यात पडलेले, इतस्तत: विखुरलेले खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था (एनजीओ) तसेच इतर संघटनांना देण्यात आलेले आहेत. नागरिकांनीही असे राष्ट्रध्वज एनजीओ किंवा इतर संघटनांकडे सुपूर्द करावेत. या एनजीओ किंवा इतर संघटनांनी असे राष्ट्रध्वज तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी डुडी यांनी केले आहे.