सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यात होणारे अनाधिकृत बांधकाम, उत्खननावर सक्त कारवाई करणेत येईल. तसेच विनापरवाना वाणिज्य वापर होत असलेल्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तरी महाबळेश्वर तालुक्यामध्ये करण्यात येणारे बांधकाम व उत्खनन हे सक्षम प्राधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घेवून करण्यात यावे. तसेच यापुढे कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम व अनधिकृत उत्खनन होणार नाही, याची दक्षता स्थानिकांनी घ्यावी, तसे असल्यास कायदेशीर कारवाई करावे, असे आदेश अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथे नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनधिकृत बांधकाम, विनापरवाना वाणिज्य वापर तसेच बेकायदेशीर उत्खननावर आळा घालण्यासाठी महाबळेश्वर ग्रामस्तरावर संयुक्त समिती गठित करण्यात आली. तसेच सदर समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक व नगरपरिषद स्तरावर त्यांचे प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात १०० टक्के प्लास्टिक बंदी करण्यासाठी महसूल विभाग, नगरपरिषद विभाग व वनविभाग यांनी संयुक्तरीत्या कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या. महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहात आयोजित बैठकीमध्ये शहरातील हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करताना प्लास्टिक बंदी बाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी महाबळेश्वरच्या पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी १०० टक्के प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
महसूल विभाग, नगरपरिषद विभाग व वन विभाग यांनी संयुक्तरीत्या कार्यवाही करून ठोस पावले उचलण्याचे आदेश सदर बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले. महाबळेश्वर शहरातील होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही त्यांनी संबधित विभागांना सूचना दिल्या. यामध्ये शहरातील व परिसरातील सर्व मोकळ्या जागांचा सर्व्हे करून त्या ठिकाणी पार्किग सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डॉ. साबणे रोड येथील सुशोभीकरणाबाबत नव्याने तयार केलेला पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण करून तेथील व्यापारी व नागरिक यांच्याशी बैठक घेऊन सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात यावे, असे सूचित केले.
विना परवाना बांधकामावर कारवाई करा : जिल्हाधिकारी डुड्डी
महाबळेश्वरमधील हिरडा विश्रामगृहात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकासकामे व प्रश्नांच्या अनुषंगाने बैठक पार पडली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील सद्य स्थितीत सुरू असणाऱ्या विनापरवाना बांधकामवरही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच महाबळेश्वर नगरपरिषद व हिलदारो माध्यमातून सुरु असणाऱ्या उपक्रमाबाबत घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने केंद्र उभारण्यासाठीच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला दिल्या. त्याचबरोबर हरित व स्वच्छ शहर बनविण्याच्या अनुषंगाने प्लास्टिक बंदी मोहीम कडक राबविण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. शहरातील डॉ.साबणे रोड व वेण्णा लेक सुशोभिकरणाबाबत तसेच शहरातील वाहतूक आराखडा व पार्किंग व्यवस्थे बाबत तात्काळ सुधारणा अंमलात आणण्यात याव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.