सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना असून, या योजनेपासून पात्र महिला लाभार्थी वंचित राहणार नाहीत, यासाठी सर्व बँकांनी २१ वर्षांवरील महिलांचे बंद असलेले बँक खाते लवकरात लवकर सुरू करावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, जिल्हा खाते उपनिबंधक मनोहर माळी, महाराष्ट्र असे बँकचे झोनल मॅनेजर सौरभ सिंग, रिझर्व्ह बँकेचे विजय कोरडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नितीन तळपे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना १ हजार ५०० रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. ज्या महिलांचे बँक खाते उघडण्याचे अर्ज येतील, त्याच दिवशी बँकेने बँक खाते उघडावे. त्याचबरोबर प्रत्येक शाखानिहाय बँकांना पीक कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे १ उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
१६ हजार ५० कोटी पतपुरवठा आराखड्याचे लोकार्पण
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत सन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षाच्या १६ हजार ५० कोटींच्या पतपुरवठा आराखड्याचे लोकार्पण जिल्हाधिकारी डुडी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्याच्या विकासासाठी पतपुरवठा आराखड्या नुसार बँकांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या पत पुरवठा आराखड्यात पीककर्ज ३ हजार ६०० कोटी, कृषी क्षेत्र ५ हजार ७०० कोटी, बिगर कृषी क्षेत्रासाठी २ हजार २५० कोटी इतर क्षेत्रांसाठी २ हजार ४०० कोटी, प्राथमिक क्षेत्रासाठी १० हजार ३५० कोटी, गैर प्राथमिक क्षेत्रासाठी ५ हजार ७०० कोटी असा एकूण १६ हजार ५० कोटींचा पत आराखडा तयार करण्यात आला आहे.