सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या जावळी तालुक्यातील कुडाळी प्रकल्पांतर्गत महू – हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात आज मुख्यमंत्र्यांचे समन्वयक मिलिंद शिंदे यांच्यासमवेत धरणग्रस्तांची बैठक पार पडली. या बैठकीत गेली २७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धरणाचे बांधकाम ९५ टक्के झाले, मात्र धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणे शिल्लक आहे. त्यात अनेक अडचणी आहेत. या सोडवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डूडी म्हणाले की, महू-हातगेघर धरणग्रस्तांचे उर्वरित पुनर्वसनाचे सर्व प्रश्न तीन महिन्यात निकाली काढण्यात येतील. कोणाचे प्रश्न प्रलंबित असतील त्यांनी आपले अर्ज संबंधित विभागाकडे दाखल करावेत. अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने काय कारवाई केली याची अपडेट द्यावी. याबाबत कोणी हलगर्जीपणा केल्यास सबबी ऐकून घेणार नाही. अधिकाऱ्यांनी फास्ट ट्रॅकवर या प्रश्नांना प्राधान्य देवून ते तातडीने मार्गी लावावेत. बरोबर एक महिन्यानंतर मी याचा आढावा घेणार आहे, याच्यात दिरंगाई आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच जिल्हाधिकारी डूडी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी पार पडलेल्या बैठकीत संकलन दुरुस्ती, जमिनीचे न्यायप्रविष्ठ प्रश्न, गावठाण सीमांकन, एकुमॅ प्रश्न, वंचित धरणग्रस्तांना लाभक्षेत्रातील जमीन देणे, मूळ मालकाकडून येणाऱ्या अडचणी, कजाप, ईश्वर चिट्ठीद्वारे देण्यात आलेल्या जमिनी, जमिनीतून गेलेल्या कॅनालमुळ बाधित जमिनी, ज्यांना अद्याप जमिनी मिळाल्या नाहीत असा अनेक प्रश्नांवर यावेळी चर्चा करून काही ठोस निर्णय घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे धरणग्रस्त काहीअंशी खुश होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी धरणग्रस्तांविषयी असलेली भावनिक तळमळ व्यक्त केली आणि तुमचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे अभिवचनही त्यांनी दिले.
महू-हातगेघर धरणाचे उर्वरित काम उद्यापासून सुरू करणार असल्याचे कार्यकारी अभियंता विकास पाटील यांनी सांगितले. त्यावेळी धरणग्रस्तांनी काम सुरू करण्यास विरोध केला. फक्त सिंचनाचे काम सुरू करावे. उर्वरित काम करू नये, असा आग्रह धरला. धरणाचे काम सुरू करण्यावरून धरणग्रस्त आणि अधिकारी यांच्या शाब्दिक खडाजंगी झाली.