सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे दरडी कोसळणे, भूस्खलन यांचा धोका वाढलेला आहे. अशा स्थितीत प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी संभाव्य धोक्यांचा इशारा देणारी लक्षणे लक्षात घेऊन तात्काळ लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. लोकांचे जीव वाचविणे या गोष्टीला प्राधान्य देऊन त्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व उपाययोजना त्वरित कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व भूस्खलन आणि पुनर्वसन बाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दूरदृष्टी प्रणाली द्वारे बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी नदी, नाल्यांवरील अतिक्रमणे, गाळ काढण्याची मोहीम जिल्ह्यात सर्व ठिकाणी हाती घेण्यात यावी. यामध्ये पोलीस विभागाशी समन्वय ठेवावा. नगरपालिकांनी शहरी भागात ही मोहीम राबवावी, असे निर्देश दिले. पूर प्रवण, दरड प्रवण क्षेत्रासाठी दिलेले साहित्य तपासून घेऊन आवश्यकतेनुसार त्याचा वापर करावा. पाऊस, पूर यामुळे बाधित झालेल्या रस्त्यांची कामे जवळच्या यंत्रणांनी तात्काळ पूर्ण करावीत, असेही निर्देश दिले.
दरड प्रवण, भूस्खलन प्रवण गावांच्या कायमस्वरूपी स्थलांतर व पुनर्वसनासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात यावेत. ज्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी शासकीय जागांमध्ये तर शासकीय जागा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी खाजगी जागांमध्ये स्थलांतरणासाठी नियोजन करण्यात यावे. अशा सूचना जिल्हाधिकारी डूडी यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना नियमित भेटी द्याव्यात. औषधे, टीसीएल पावडर यांचा पुरेसासाठा उपलब्ध असल्याची खातर जमा करावी. पाण्याचे नमुने सातत्याने तपासावेत. दूषित पाण्यामुळे आजार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आपत्ती निवारणार्थ दिलेल्या साहित्याचा वापर करावा, असे निर्देश यावेळी दिले.
भूस्खलनापूर्वी, दरड कोसळण्यापूर्वी घडतात ‘या’ महत्वाच्या गोष्टी
या बैठकीसाठी जीआयसीचे तज्ज्ञ हेमंत कुलकर्णी यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी संभाव्य भूस्खलनापूर्वी, दरड कोसळण्यापूर्वी दिसणाऱ्या लक्षणांची माहिती देत ते म्हणाले, कोयना खोऱ्यातील भूस्खलन प्रवण भागाचा विशेष अभ्यास करून यादी तयार करण्यात येत आहे. आठ ते दहा दिवस सरासरी 100 मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस या खोऱ्यात सुरू असल्याने पुढच्या 36 ते 72 तासात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. भूस्खलनाचा धोका संभावन्यापूर्वी पुढील लक्षणे आढळून येतात . यामध्ये दोन- तीन तासापेक्षा जास्त विहिरी ओसंडून वाहणे, नवीन झरे फुटणे, अस्तित्वात असणाऱ्या झऱ्यांचा विसर्ग वाढतो.
तसेच त्यांच्या पाण्याच्या तापमानात काही अंशी वाढ होणे, बोरवेल, हातपंप या मधून आपोआप पाणी वाहणे, मानवी वस्ती असणाऱ्या घरांच्या खालूनही पाणी वर येणे, दगडाखालील जमिनीला भेगा पडणे, याबरोबरच पाळीव कुत्री, गोठ्यातील जनावरे यांनाही काही काळ आधी धोका कळतो त्यामुळे त्यांचे निरीक्षण करावे. अशी सर्व लक्षणे विशेषत्वाने जाणवतात याकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.बी नागरिकांचे स्थलांतर करताना 350 मीटरच्या बाहेर स्थलांतर करणे आवश्यक असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.