कराड प्रतिनिधी | कराड येथील कोल्हापूर नाक्या नजीक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर दुचाकीस्वार युवक आणि महिला वाहतूक पोलिसात वाद झाला. या वादावादीवेळी संबंधित महिला पोलिसाने कॉलर पकडून मारहाण केल्याचे युवकाचे म्हणणे आहे. तर युवकाने सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप महिला पोलिसाने केल्याची घटना शनिवारी घडली. रात्री उशिरापर्यंत याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ – अधिकाऱ्यांसमोर चौकशी सुरू होती.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत शहर वाहतूक पोलीस विभागातील एक महिला कर्मचारी कर्तव्य बजावत होती. यावेळी दुचाकीवरून निघालेल्या युवकास महिला पोलिसाने अडवले. त्यावेळी संबंधित युवक व महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, संबंधित महिला कर्मचाऱ्याने युवकाचा शर्ट पकडत गालात मारहाण केल्याचे युवकाचे म्हणणे आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्याने अरेरावी करीत चापट मारल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर संबधित युवकाला सोबत घेत मलकापूरचे माजी नगरसेवक दादा शिंगण शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. तसेच संबंधित महिला पोलीस कर्मचारीही पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. रात्री साडेआठ वाजे पर्यंत या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नव्हती.
व्हिडीओ सोशल मीडियावर…
संबंधित घटनेवेळी ज्या युवकाचा शर्ट पकडत गालावर मारल्याचा दावा केला जात आहे, त्या युवकाच्या मित्राने आपल्या मोबाईलवर व्हिडीओ चित्रीत केला आहे. संबंधित युवक व दादा शिंगण हे हा व्हिडीओ घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.