सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; महाबळेश्वरचा पारा ‘इतक्या’ अंशांवर

0
5

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. दरम्यान, बुधवारी सातारा शहरात १४.९, तर महाबळेश्वरला १२.९ किमान तापमानाची नोंद झाली. त्यातच वातावरणात शीतलहरीही असल्याने दिवसाही गारवा झोंबतो, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. वाढत्या थंडीपासून सुटका मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.

सातारा जिल्ह्यात जानेवारी महिना सुरू झाल्यापासून थंडीची तीव्रता वाढत गेली. सातत्याने किमान तापमानात उतार येत गेला आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपूर्वी महाबळेश्वरपेक्षा साताऱ्यात थंडीची परिणामकारकता अधिक होती. त्यातच वाढत्या थंडीमुळे जिल्ह्याचा ग्रामीण भाग गारठला आहे. सकाळी सात-आठ वाजेपर्यंत धुके दिसून येते. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवरही परिणाम झाला आहे. रोग पडल्याने शेतकऱ्यांना रासायनिक औषधांची फवारणी करावी लागत आहे.

त्याचबरोबर शेतीची कामेही ऊन पडल्यानंतर दुपारच्या सुमारास करावी लागतात. तर गावोगावी रात्री आणि पहाटेच्या सुमारास शेकोट्या पेटल्याचे दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठेवरही थंडीचा परिणाम झाला आहे. रात्री आठ वाजेनंतर मोठ्या शहरातील दुकानांत तुरळकच लोक खरेदीसाठी दिसतात.

सातारा शहरासह महाबळेश्वरमध्येही थंडी वाढली आहे. काही दिवसांपासून किमान तापमान १५ अंशांखाली कायम आहे. यामुळे सायंकाळी सहा वाजेनंतरच थंडी जाणवायला सुरुवात होते. रात्री दहानंतर तर कडाक्याची थंडी पडत आहे. सकाळी नऊ वाजले तरी अंगातून थंडी जात नाही, अशी स्थिती आहे. त्यातच उत्तर बाजूकडून शीतलहरी येत आहेत. यामुळे दुपारी १२ नंतरही अंगाला गारवा झोंबत असल्याचे चित्र आहे. अजूनही काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. यामुळे सातारकरांना यापुढेही थंडीचा सामना करावा लागणार आहे.