सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात आठ दिवसांपासून गायब झालेली थंडी परत येऊ लागली आहे. सातारा शहराच्या किमान तापमानात जवळपास ६ अंशांनी उतार आला आहे. सोमवारी १६.५ अंशाची नोंद झाली तर महाबळेश्वरलाही १५ अंश किमान तापमान नोंद झाले. यामुळे जिल्ह्यात हळूहळू गारठा वाढू लागला आहे.
जिल्ह्यात दरवर्षीच ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात थंडीची चाहूल लागते. त्यानंतर थंडीची तीव्रता वाढत जाते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात पारा १० अंशांपर्यंत खाली येतो तर महाबळेश्वर आणि पाचगणीसारख्या थंड हवेच्या जागतिक पर्यटनस्थळी दवबिंदू गोठतात. पण, यावर्षी थंडीबाबत वेगळाच अनुभव येत आहे. कारण, यंदा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतरच थंडीला सुरूवात झाली.
२० नोव्हेंबरनंतर मात्र पारा वेगाने खाली येऊ लागला. डिसेंबर महिना उजाडेपर्यंत जिल्ह्यात थंडीचाच कडाका होता. जवळपास १० दिवस कडाक्याच्या थंडीशी जिल्हावासीयांना सामना करावा लागला. किमान तापमान १० ते १३ अंशादरम्यान होते. यामध्ये सातारा शहरात ११.९ तर महाबळेश्वरमध्ये १०.५ अंश नोंद झाले. हे या हंगामातील निच्चांकी तापमान ठरले होते. तसेच मागील काही वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील ही सर्वांत कमी तापमानाची नोंद ठरली. नोव्हेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडल्याने डिसेंबर महिना आणखी तापदायक ठरणार, असा अंदाज व्यक्त होत होता.
पण, डिसेंबर उजाडताच जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले. काही ठिकाणी हलकासा पाऊसही झाला. त्यामुळे किमान तापमानात वाढ होत गेली. बहुतांशी भागातील किमान तापमान २२ ते २४ अंशादरम्यान राहिले. यामुळे थंडी गायब झाली होती तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत होता. अशातच पुन्हा थंडी वाढू लागली आहे. किमान तापमानात उतार येत चालला आहे.
चारच दिवसात तापमान 6 अंशांनी तापमान खाली…
सातारा शहरात ४ डिसेंबरला किमान तापमान २२.७ अंश नोंद झाले होते. त्यानंतर उतार येत गेला. सोमवारी तर १६.५ अंश नोंद झाली. त्यामुळे चारच दिवसात तापमान ६ अंशांनी खाली आले. परिणामी, थंडी परतू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच महाबळेश्वरचे किमान तापमानही १७ अंशापुढे गेले. येथील तापमानही दोन अंशाने घसरले आहे. सोमवारी १५ अंशाची नोंद झाली. त्यामुळे महाबळेश्वरसह परिसरातही थंडी वाढत असल्याचे समोर आले आहे.