पश्चिम महाराष्ट्रात 900 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प कामांना सुरुवात; जिल्ह्यातील 39 उपकेंद्रांसाठी काम सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची युद्धपातळीवर अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. आवश्यक शासकीय जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात ९०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरवात झाली असून १७० उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येईल व उपकेंद्रांतील वीजवाहिन्यांद्वारे शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील ३९ उपकेंद्रांसाठी २०८ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीचे काम संबंधित एजन्सीकडून सुरू करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ७०७ उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ५ हजार ८७७ मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे लक्ष्य असून आतापर्यंत ५ हजार ३४४ एकर शासकीय जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्यक्ष सौर ऊर्जा निर्मितीच्या या योजनेतून शेतीला दिवसा वीज पुरवठ्यासोबतच राज्याच्या ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार आहे.

या योजनेद्वारे विकेंद्रित पद्धतीने राज्यामध्ये अंदाजे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. विशेष म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, ती २५ वर्ष चालवणे आणि देखभाल व दुरुस्ती करणे याद्वारे ग्रामीण भागात अंदाजे ६ हजार पूर्णवेळ तर १३ हजार अर्धवेळ रोजगार निर्माण होतील. सोबतच सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित केले जातील अशा ग्रामपंचायतींना अंदाजे २०० कोटींपेक्षा जास्त अनुदान प्राप्त होऊन जनसुविधेची काम होणार आहेत.

नऊ तालुक्यातील ‘या’ गावांचा प्रकल्पात समावेश

1) कराड : पेरले, टेंभू, वहागाव, वडगाव हवेली, घारेवाडी, शिरवडे, पोतले, नवीन नांदगाव – गट क्रमांक २५०, नवीन नांदगाव – गट क्रमांक २५०, मनू, कालवडे, विंग, हणबरवाडी, कामथी.

2) सातारा : वडूथ, गणेशनगर, भाटमरळी, कोपर्डे, निगडी वंदन

3) कोरेगाव : पिंपोडे बुद्रुक, सासुर्वे, चंचळी, तारगाव, कुमठे, भाकरवाडी.

4) खटाव : सूर्याचीवाडी, कातरखटाव गट क्रमांक ५९९, कातरखटाव गट क्रमांक ६४९, हिवरवाडी, धोंडेवाडी, विखळे, राजापूर गट क्रमांक १७३२, राजापूर गट क्रमांक ४२७.

5) फलटण : कापडगाव, टाकळवाडी, वाखरी, सासकल, शेरेचीवाडी.

6) खंडाळा : भादे, मरिआईचीवाडी.

7) पाटण : अंबवडे खुर्द, बेलवडे खुर्द, सोनाईचीवाडी.

8) वाई : मेणवली.

९) माण : बिजवडी, शेनवडी, देवापूर गट क्रमांक १०६, देवापूर गट क्रमांक ५४

‘या’ ठिकाणी सुरू झाले प्रत्यक्ष काम

पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील ३९ उपकेंद्रांसाठी २०८ मेगावॅट, सांगली ३२ उपकेंद्रांसाठी २०७ मेगावॅट, कोल्हापूर ४४ उपकेंद्रांसाठी १७० मेगावॅट, पुणे ४१ उपकेंद्रांसाठी २३४ मेगावॅट आणि सोलापूर जिल्ह्यातील १४ उपकेंद्रांसाठी ८१ मेगावॅट असे एकूण १७० उपकेंद्रांसाठी ९०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीचे काम संबंधित एजन्सीजकडून सुरू झाले आहेत.

प्रकल्पास काही गावांचा नकार

सातारा जिल्ह्यातील 9 तालुक्यांतील 48 गावांत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० तथा सोलर पार्क प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा वीज मिळणार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तर या योजनेस जमीन देण्यास काही गावांनी नकार दर्शविलेला आहे.

6 हजार लोकांच्या हाताला मिळणार पूर्णवेळ रोजगार

या योजनेतून शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासोबतच राज्याच्या ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार आहे. या योजनेद्वारे विकेंद्रित पद्धतीने राज्यामध्ये अंदाजे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. विशेष म्हणजे सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, ते २५ वर्षे चालविणे आणि देखभाल व दुरुस्ती करणे याद्वारे ग्रामीण भागात अंदाजे ६ हजार पूर्णवेळ, तर १३ हजार अर्धवेळ रोजगार निर्माण होतील.

ग्रामपंचायतींना 3 वर्षांत 15 लाख रुपयांचे अनुदान

उपकेंद्राच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा शाश्वत वीजपुरवठा होणार असल्याने वेगाने उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित होतील त्या प्रत्येक ग्रामपंचायतींना पाच लाख प्रतिवर्ष असे तीन वर्षांत १५ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० चे फायदे

1) शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा शाश्वत अन् १२ तास वीजपुरवठा उपलब्ध होणार
2) प्रत्येक ग्रामपंचायतींना पाच लाख प्रतिवर्ष असे तीन वर्षांत १५ लाख रुपयांचे अनुदान
3) पश्चिम महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ९०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पांचे कामे सुरु