सातारा प्रतिनिधी । राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट पीएचसी’चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) व अन्य उपक्रमांचा ई- शुभारंभ, ई- भूमिपूजन, लोकार्पण श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सर्वश्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले. राज्य शासनाने २०३५ चे व्हिजन तयार केले आहे. त्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत अनेक निर्णय घेतले. वैद्यकीय महाविद्यालयांना जोडलेली जिल्हा रुग्णालये परत मिळण्यात अनेक वर्षे जातात, म्हणून पर्यायी यंत्रणा उभी राहावी यासाठी निर्णय घेतले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाख रुपयांची मर्यादा पाच लाख रुपयांवर नेण्याचा निर्णय व त्याचा सर्वांना लाभ, आरोग्य विभागामार्फत महिला व बालकांची आरोग्य तपासणी, शासकीय रुग्णालयात कॅशलेस सेवा देण्याचा निर्णय राबविण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षात सुमारे १५० कोटी रुपयांहून अधिकचा मुख्यमंत्री सहायता निधी लोकांना दिला आहे.