सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने सातारा जिल्हयातील कांदाटी खोऱ्यातील दरे तांब, अकल्पे याठिकाणी मिशन बांबू लागवड उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायत संस्थाचे सदस्य पाशा पटेल, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार वर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उप वनसंरक्षक श्रीमती भारद्वाज, सामाजिक वनीकरण विभागाचे श्री. वाघमोडे यांच्यासह विविध गावचे सरपंच उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, येत्या 6 महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासुन फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल. त्याचबरेाबर पर्यटन वाढीलाही जिल्ह्यात चालना देण्यात येईल. त्यादृष्टीने सुक्ष्म आराखडा तयार करुन नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील. पर्यावरणपुरक विकास हे तत्व अंगिकारण्यात येऊन त्यादृष्टीने सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी केला ‘या’ उपक्रमाचा शुभारंभ pic.twitter.com/N5oJ5zP3NK
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 12, 2023
बांबूपासून वेगवेगळे साहित्य, फर्निचर, इथेनॉल, अलंकार वस्तू बनवू शकतो, या सर्वांच्या निर्मितीतून बांबूपासून उत्पनाचे एक चांगले मॉडेल तयार होईल. कांदाटी खोऱ्यातील जमीन उंच सखल आहे. या जमिनीचा वापर बांबू उत्पादनासाठी होऊ शकतो. बांबूसाठी हेक्टरी 6 लाख 90 हजारापर्यंतची रक्कम शासन शेतक-यांना टप्याटप्याने देते. चौथ्या वर्षी उत्पादन सुरु झाल्यावर एकरी एक लाखापर्यंत त्याला उत्पन्न मिळू शकते. शेतकरी समृध्द झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून शासन काम करत आहे. त्यासाठी अनेक क्रांतीकारी निर्णय आपण घेत आहोत.
यावेळी पाशा पटेल यांनी बांबू उत्पादन लागवड, शासनाचे अनुदान, बांबू निर्मितीपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तू याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन मुख्यमंत्री महोदयांनी बांबू मिशनअंतर्गत राबविण्यात येणा-या कार्यक्रमाला दिवसभरातला मोठा वेळ देणे, हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचे सांगितले. त्यांनी बांबूपासून बनिविण्यात आलेली खुर्ची, विठ्ठल मुर्ती व अन्य बांबूपासून निर्मित वस्तू मुख्यमंत्री महोदयांना सादर केल्या.