सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या दरे आणि आजुबाजूच्या पंधरा गावांचे ग्रामदैवत असलेल्या उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री साताऱ्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
यात्रेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत
महाबळेश्वर तालुक्यातील दरे, तांब, उचाट आदींसह पंधरा गावांचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा सध्या सुरू आहे. यात्रेसाठी मुख्यमंत्री दोन दिवस आपल्या मूळ गावी आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर यात्रेसाठी ते दुसऱ्यांदा गावी आल्याने गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. या दौऱ्यात ते सातारा जिल्ह्यातील विकास कामांची माहिती घेणार आहेत.
मुख्यमंत्री घेणार ग्रामसभा
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी ग्रामसभा होणार आहे. यात्रेशिवाय मुख्यमंत्र्यांचा अन्य कोणताही कार्यक्रम होणार नाही. दरे परिसरातील ग्रामस्थांच्या व साताऱ्यातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि शेत शिवार भेट, असा मुख्यमंत्र्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलं स्वागत
मुख्यमंत्री मंगळवारी सायंकाळी हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. सातारा जिल्हा पोलीस दलाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी वाईचे प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचिंम उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे शेतीत आधुनिक प्रयोग
दरे गावात मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतीत वेगवेगळ्या पिकांची लागवड केली आहे. नवनवीन प्रयोग आणि सेंद्रिय शेती केली आहे. त्यांची पाहणी ते करणार आहेत. स्ट्रॉबेरी, सुपारी, लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, मिरची, हळद, अशी पिके मुख्यमंत्र्यांच्या शेतात पाहायला मिळतात.