कराड प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस झाले सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत. गावी आल्यानंतर त्यांनी काल दिवसभरात अनेक कामे करत अनेक ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या शेतात पत्नीसह केळीची लागवड केली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत ५ हजार केळींच्या झाडांची लागवड करण्यात आली. तसेच नारळाच्या झाडांची देखील त्यांनी लागवड केली.
मुख्यमंत्री शिंदे जेव्हा शेत शिवारात गेले तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लताताई शिंदे या देखील शेतात उपस्थित होत्या. शेतीमधील कामे आटोपल्यानंतर त्यांनी थेट कोयनानगर गाठले. कारण कोयना धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला असून हा गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी कोयनेच्या पात्रातून फेरफटका मारला.
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्ती शेती करण्याचे धोरणं अवलंबण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदेनी यावेळी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे अनेक ग्रामस्थ समस्या घेऊन तसेच त्यांची कामे घेऊन आले होते. त्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी साठ्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. कोयना जलाशयातील कमी झालेला जलसाठा व जलाशयातील साठलेला गाळ उचलण्याची असलेली संधी पाहता गाळमुक्त धरण योजनेंतर्गत गाळ उचलण्याच्या सूचना दिल्या.