मुख्यमंत्री फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद; सातारा जिल्ह्यासाठी 7 कलमी कार्यक्रम

0
18

सातारा प्रतिनिधी | सरकारी विभाग व कार्यालयांची वेबसाईट अद्ययावत करावी. ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करावे. शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी. नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. शासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आदी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. दरम्यान, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य (व्हीसी) प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते. सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सूचना केल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबत 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाणार आहे.

यावेळी साताऱ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे. माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करावे. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी. अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावीत. खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत. शासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. अधिकार्‍यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी प्रसाधनगृह स्वच्छ असावे. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवण्यात यावेत.

या’ केल्या महत्वाच्या सूचना

प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, यासाठी प्रयत्न करावा. अधिकारी व नागरिकांना आवश्यक माहिती फलकावर नमूद करावी. नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या या तालुका व जिल्हास्तरावरच सोडवावेत. पण असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी लोकशाही दिन यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील विविध महत्त्वाचे कार्यक्रम आणि योजनांना भेटी दिल्या पाहिजेत. तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी झाल्या पाहिजेत. त्याचे वेळापत्रक निश्चित करावे. संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का याबाबत लक्ष ठेवावे, अशी सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सात कलमी कृती कार्यक्रम काय?

विभाग व कार्याची वेबसाईट अद्ययावत करा. ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करावे. शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवा. नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित प्रकरणे निकाली काढा. उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. शासनाचे महत्त्वाचे प्रकल्प व योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्या. शासकीय कार्यालयात येणार्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा सात कलमी कृती कार्यक्रम ठरवून दिला आहे.