क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या द्विशताब्दीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

0
2

सातारा प्रतिनिधी । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा. त्यासाठी प्रशासनाने 10 एकर जमिनीचे तात्काळ अधिग्रहण करावे, असे निर्देश देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त नायगाव येथे आयोजित सावित्रीमाई जयंती उत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून अभिवं केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार सर्वश्री छगन भुजबळ, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, जिल्हाधिकारी संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी दाखवलेल्या सन्मार्गावर विकास पोहोचविण्याचे काम करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जिवंत स्मारक म्हणजे सक्षम महिला होय. त्यांचा विचार समाजात तळागाळापर्यंत रुजवून स्वयंपूर्ण व स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभारणाऱ्या महिला घडविण्याचे कार्य शासन करेल. महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाल्याने पुढील काळात निश्चितपणे महिलाराज येईल. केंद्र शासनाच्या लखपतीदीदींसारख्या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या दोन तीन वर्षात 50 लाख महिलांना लखपती दीदी घडविण्याचे कार्य शासनाने हाती घेतले आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीचीही पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव, ता. खंडाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी असलेल्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांच्यासमवेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीचीही पाहणी केली. या ठिकाणी स्मारक उभारणी आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर करण्यात आले. करण्यात आले.

आमदार छगन भुजबळ यांनी केली महत्वाची मागणी

आमदार छगन भुजबळ यांनी फुले दांपत्याचा विरोध हा ब्राह्मण्यवादाला होता, कोणत्या जातीपातीला नव्हता असे सांगून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या जीवनातील महत्त्वाची ठिकाणे जोडण्याचे काम मार्गी त्वरित लावावे, तसेच सावित्रीबाई फुले यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार हा 3 जानेवारी रोजी नायगाव येथील कार्यक्रमातच दिला जावा, फुले दांपत्याच्या साहित्याचे पुनर्मुद्रण व्हावे अशी मागणीही त्यांनी केली.

MPSC परीक्षेत मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे हिचा सत्कार

नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 जयंती निमित्त सावित्रीमाई जयंती उत्सव घेण्यात येत आहे. या ठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यासाठी महाज्योतीने स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत 2022-23 वर्षात घेण्यात आलेल्या ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी’ (राजपत्रित) पदाच्या अंतिम निकालात महाज्योती संस्थेच्या मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या मैत्रेयी अविनाश जमदाडे हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुण्यात राहणाऱ्या मैत्रेयी जमदाडे हिने महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बहुजन कल्याण व स्त्रीशिक्षण या विचारांवर उभारण्यात आलेल्या ‘महाज्योती’ संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन हे यश प्राप्त केले आहे. या घवघवीत यशामुळे आपल्याला आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

ग्रामविकास मंत्री म्हणून नायगाव मी दत्तक घेत आहे : मंत्री जयकुमार गोरे

यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. स्त्री शिक्षणाची सुरवात झाल्यामुळे आज महिला समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे गाठत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थान असलेले हे गाव ग्रामविकास मंत्री म्हणून मी दत्तक घेत आहे. यापुढे कामासाठी निवेदने येणार नाहीत, या पध्दतीने नायगावचा विकास केला जाईल. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव प्रेरणास्थान असून त्यांचे विचार उर्जा देणारे आहेत. त्यांच्या सन्मानाला साजेसे स्मारक उभारण्यासाठी दहा एकर जागा शासनाने खरेदी करावी व स्मारकासाठी 125 कोटी रुपये द्यावेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विकास आराखडा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी केली. स्मारकाचे काम मंजूर झाल्यानंतर हे स्मारक दोन वर्षाच्या आत उभे राहील. या स्मारकामध्ये महिला सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षणे देण्यात येतील. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करुन आर्थिक सक्षम केले जाईल, अशी ग्वाहीही श्री. गोरे यांनी दिली.

नायगाव आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र होण्यासाठी प्रयत्न करू : मंत्री मकरंद पाटील

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले, १ जानेवारी १८४८ ला मुलींच्या पहिल्या शाळेची सुरुवात करून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी वर्षानुवर्ष प्रगतीपासून दूर असणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यास सुरुवात केली. फुले दांपत्याने समाजाला दिशा दाखवण्याबरोबरच अंधकारातून व अंधश्रध्देतून बाहेर काढले. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत याचे श्रेय फुले दांपत्याचे आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगावच्या विकासासाठी आतापर्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत, यापुढेही ते अखंड सुरू राहतील. नायगाव हे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील.