मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केला साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकांचा गौरव

0
734
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | दि. 7 जानेवारी ते दि. 16 एप्रिल या कालावधीत राज्यात 100 दिवसांची ‘कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम’ हाती घेण्यात आलेली होती. या मोहिमेत सातारा पोलिस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पोलिस अधीक्षक समीर शेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा दि. 27 फेब्रुवारी रोजी आढावा घेण्यात आला. या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व पोलिस अधीक्षक कार्यालयांमधून सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांना अभिनंदन पत्र देत गौरव केला. सातारा जिल्हा पोलीस दलाने केलेल्या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सातारा जिल्हा पोलीस दलातील अंमलदार यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, आयुक्त, संचालक, पोलिस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम आदी निकषांच्या आधारे या मोहिमेचे मूल्यमापन करण्यात आले.