सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील देवापूर येथे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातील दुकानासमोर दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत म्हसवड पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की स्वस्त धान्य दुकान बेकायदेशीर चालवत असल्याची तक्रार दिल्याच्या कारणावरून व दुकानातून धान्य देण्याच्या कारणावरून दुकानासमोरच शुक्रवारी दुपारी एक वाजता दोन गटांत काठी, कोयता, लोखंडी रॉड, दगड व लाथाबुक्क्यांनी तुफान हाणामारी करून एकमेकांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एका गटातील संजय धोंडीराम बाबर (वय ३८, रा. देवापूर) यांनी माजी सरपंच शहाजी बाबर, सयाजी बाबर, सागर बाबर, ज्ञानदेव बाबर, रावसाहेब बाबर, विजय बाबर, आनंदा बाबर, जनार्दन बाबर (सर्वं रा. देवापूर) यांच्यावर काठी, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी करून सोन्याची चैन काढून घेतल्याची तक्रार दाखल केली आहे,
तर दुसऱ्या गटातील सागर आनंदराव बाबर (वय ३४ रा. देवापूर) यांनी संजय बाबर, हेमंत बाबर, शामराव बाबर, जालिंदर बाबर, जितेंद्र बाबर, उत्तम बाबर, शंकर बाबर, राहुल बाबर (सर्व रा. देवापूर) यांच्यावर शिवीगाळ करून कोयता, लोखंडी रॉडने मानेवर हातावर पायावर छातीवर पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी करून गळ्यातील सोन्याची चैन व खिशातील पाच हजार काढून घेतल्याची तक्रार दाखल केली आहे.
या घटनेची नोंद म्हसवड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हवालदार नीता पळे, महिला पोलिस एम. एन. हांगे, पोलिस हवालदार डी. पी. खाडे पोलिस हवालदार लुबाळ करत आहेत.