पाण्यासाठी नागरिकांचा जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या; 2 आठवड्यापासून पाणीपुरवठा ठप्प

0
232
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । गेल्या दोन आठवड्यापासून समाधीचा माळ, दरे व पेठ्याचा भैरोबा परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तो पूर्ववत करण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याने संतप्त रहिवाशांनी गुरुवारी जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढला. महिलांनी पाण्याची रिकामी भांडी घेऊन कार्यालयात ठिय्या आंदोलन करतानाच अधिकाऱ्यांना घेरावही घातला. आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.

समाधीचा माळ, दरे परिसराला कण्हेर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हा भाग जरी पालिकेच्या अखत्यारित असला तरी योजना जीवन प्राधिकरणकडून चालविली जाते. या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सातत्याने गळती लागत आहे. मात्र दुरुस्तीकडे प्राधिकरण डोळेझाक करत असून, पालिकेला ही कामे करावी लागत आहेत. येथील रहिवाशांनी अनामत रक्कम भरून आज सात वर्षे झाली तरी नळांना मीटर बसविण्यात आले नाही. पाणी गळतीमुळे नागरिकांना आजवर कधीही नियमित व पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा झालेला नाही. आता तर सोळा दिवसांपासून या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून, पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

या योजनेची जबाबदारी असलेल्या जीवन प्राधिकरणकडून मात्र देखभाल दुरुस्ती व अन्य कामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप यावेळी नागरिकांनी केला. प्राधिकरणने नळांना मीटर बसवावेत, मुख्य लाईनवरील नळजोडण्या काढून त्या सबलाईनवर जोडाव्यात, अशा मागण्या यावेळी नागरिकांनी केल्या. उपकार्यकारी अभियंता लीना गडकरी यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारून याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.