सातारा प्रतिनिधी | सातारा शहराची लाईफलाईन असलेल्या कास तलावामध्ये तब्बल 45 फूट पाणीसाठा आहे. अजूनही म्हणावा तसा पावसाने अपेक्षित जोर धरलेला नसला तरी मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या पूर्व मोसमी दमदार पावसाने कासची पाणी पातळी सहा फुटाने वाढली आहे. तरीही सातारा नगरपालिका पाणी कपातीचे वेळापत्रक मागे घ्यायला तयार नाही. परिणामी कास तलावातून वारंवार होणारा अपुरा पाणीपुरवठा तसेच गढूळ पाण्याबरोबर वाहून येणारा गाळ यामुळे सातारकर हैराण झाले आहेत.
सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणामध्ये सध्या 45 फूट पाणीसाठा आहे. सातारा शहरात सुमारे 17 हून अधिक साठवण टाक्या आहेत. या टाक्यांमधून शहराच्या विविध प्रभागांत पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी कपातीमुळे मागील दोन महिन्यांपासून या टाक्यांवर आधारित प्रभागात वेळापत्रकानुसार पाणी कपात सुरू आहे.
मात्र, सध्या सुरू झालेल्या पावसामुळे विशेषतः पूर्वमोसमी पावसामुळे कास धरणाच्या पाणीसाठा सहा फुटाने वाढला आहे. कास धरणाची एकूण क्षमता 0.5 टीएमसी इतकी झाली आहे. पाणीपुरवठा विभागाने मार्च महिन्यामध्ये सातारा शहरासाठी पाणी कपात जाहीर केली होती. अजूनही ती मागे घेण्यात आलेली नाही. शहराच्या पश्चिम भागाला विशेषतः मंगळवार पेठ, बोगदा परिसर, ढोणे कॉलनी, रामाचा गोट, सोहनीची गिरणी परिसर,
केसरकर पेठ, गुरुवार पेठ, सर्वोदय कॉलनी येथे कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. तसेच साठवण टाक्यांची स्वच्छता झाली असली तरी अजूनही गाळमिश्रित पाण्याचे प्रमाण थांबलेले नाही. त्यामुळे सातारकरांना शुद्ध पाणी मिळेनासे झाले आहे.