सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरात गंभीर पाणी टंचाइ निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात माजी नगरसेवक हेन्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जीवन प्राधिकरणाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. हेन्री जोसेफ, रंजन कांबळे, अनमोल कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. महाराष्ट्र प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी समोर येऊन आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली.
जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता राजकुमार आवळे, वरिष्ठ लिपिक विश्वनाथ पवार, शाखा अभियंता आनंदा तराळ यांनी तेथे येऊन, मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिले. माजी उपनगराध्यक्ष वसंत बिरामणे, टेबल लँड व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष नामदेव चोपडे, सिद्धार्थ सेवा संघाचे अध्यक्ष रंजन कांबळे, गौतम गंगावणे, अनमोल कांबळे, साजिद क्षीरसागर, इम्रान क्षीरसागर, अवी चव्हाण, महेंद्र मोरे, संजय वन्ने, ललिता मोरे, सुषमा गायकवाड, शोभा कांबळे, मीना जोसेफ उपस्थित होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.