सातारा प्रतिनिधी | लोणंद येथील सईबाई सोसायटीकडे जाणार्या रस्त्यावरील रेल्वे गेट बंद करून रेल्वेच्या वतीने उभारण्यात येणारा उड्डाण पूल रद्द करू नये, अशी मागणी महाराणी सईबाई हौसिंग सोसायटीच्या वतीने मुख्याधिकारी दतात्रय गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोणंद येथील सईबाई सोसायटीकडे जाणार्या रेल्वे गेटजवळ रेल्वेच्या वतीने एक उड्डाणपूल व भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. परंतु, या ठिकाणचा उड्डाणपूल रद्द करून भुयारी मार्ग करण्यात यावा, अशी मागणी काही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे लोणंद नगरपंचायतीकडे केली होती.
त्यानुसार नगरपंचायतीने तातडीची बैठक घेऊन उड्डाण पूल रद्द करण्याचा ठराव केला होता. त्यानंतर आता रेल्वे गेट क्र. 40 च्या पलिकडे असणार्या महाराणी सईबाई भोसले हौसिंग सोसायटीच्या संचालक मंडळाची तातडीची बैठक झाली. येथे मंजूर असलेल्या पुलाचे काम त्वरित व्हावे ते रद्द होऊ नये, अशी मागणी करणारा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.या ठरावाच्या प्रती लोणंद नगराध्यक्षा सीमा खरात, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना देण्यात आल्या.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराणी सईबाई भोसले हौसिंग सोसायटीकडे जाणार्या मार्गावर गेली 54 वर्षे रेल्वे गेट असून तेव्हापासून सईबाई सोसायटी, माऊली नगर, जांभळीचा मळा, खोतमळा, कापडगाव, आरडगाव, बैंक कॉलनी लोणंद, मार्केट यार्ड लोणंद, चव्हाणवाडी, हिंगणगाव, पूर्वेकडील सर्व गावे, मालोजीराजे विद्यालय, पोलिस स्टेशन, बाळासाहेब नगर या सर्व ठिकाणहून मोठी वाहतूक गेट नं. 40 मधून होत असते. लोणंद जंक्शन असल्यारने हे गेट बहुतांश वेळा बंदच असते. त्यामुळे या भागातील सर्वांचा येण्या जाण्याचा खोळंबा होत असतो.
काही वेळा आजारी असलेल्या रुग्णांची पंचायत होते. गेट बंद राहिल्याने काहींना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. रेल्वे दुहेरीकरणाचे काम झाल्यानंतर अजूनही रेल्वेंची संख्या या मार्गावरुन वाढणार आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यासाठी तशी भौगोलिक परिस्थिती नाही. तर, अनेकदा गेटवर प्रचंड वाहतुकीची कोंडी होते. या सर्व बाबींचा विचार करता त्वरित उड्डाण पूल व्हावा. रेल्वे उड्डान पूल झाल्यानंतर 54 वर्षाचा प्रश्न सुटणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.