‘आठवतंय का?’ म्हणत काँग्रेसच्या पृथ्वीराजबाबांना सुज्ञ नागरिकांचे प्रश्न; कराड दक्षिणेतील ‘त्या’ पोस्टरची चर्चा !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड आणि परिसरात ‘आठवतंय का?’ या आशयाचे लागलेले पोस्टर्स सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनले आहेत. या पोस्टरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे फोटो लावून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. परंतु, हे बॅनर नेमके लावले कुणी? हे जाणून घेण्याची नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

कराड शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रमुख ठिकाणी लावण्यात आलेल्या या पोस्टर्सची आता सगळीकडेच चर्चा सुरु आहे. तर एका गावातील काही सुज्ञ नागरिकांनी 10 वर्षे आमदारकी व्यर्थ का? असा सवाल उपस्थित करणारा बॅनर लावत लक्ष वेधून घेतले आहे. कराड दक्षिणमध्ये सुरू असलेलं पोस्टर वॉर आता चांगलंच पेटणार आहे. काही दिवसांत पोस्टरबाजीला आणखी धार येणार आहे. त्यावेळी दोन्ही बाजूंनी राजकीय कर्तृत्व आणि विकासकामांची तुलना झालेला पाहायला मिळू शकते.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होईल. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडे राज्यातील तसेच जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणून पाहिले जाते. कारण, या मतदारसंघात पहिल्यापासून कॉँग्रेसचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. याठिकाणी थोर विचारवंत यशवंतराव मोहिते २५ वर्षे आणि विलासकाका उंडाळकर हे सलग ३५ वर्षे आमदार होते. सध्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघातून ते तिसऱ्यांना निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपकडून डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale) उमेदवार असणार आहेत.

दोन्ही बाबांची कराड दक्षिणेत विकासकामांची बॅनरबाजी

कराड दक्षिणेत कॉंग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विकासकामांचे आकड्यांसहित बॅनर लागले आहेत. तर त्यांचे ज्या ज्या गावात बॅनर आहेत. त्या त्या गावात भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे बॅनर लावले आहेत. या दोघांच्या बॅनरची देखील चांगलीच चर्चा ग्रामीण भागात सुरु आहे.

कालवडेतील अनोख्या बॅनरने पृथ्वीराज बाबांना करून दिली ‘त्या’ विधानाची आठवण

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील कालवडे गावात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात काही सुज्ञ नागरिकांनी थेट बॅनरच लावला आहे. हा बॅनर सध्या मतदार संघात चर्चेचा विषय ठरत आहे. “३ वर्षे मुख्यमंत्री… १० वर्षे खासदारकी… १० वर्षे आमदारकी.. व्यर्थ का?” अशा आशयाचा तो बॅनर असून त्यावर कालवडे गावासाठी काय योगदान? आरोग्यासाठी? शैक्षणिक सुविधा? रोजगार निर्मितीसाठी? शासकीय योजनेचा कॅंप घेतले का?, अपंगांचा कॅंप घेतला का?, शेतकऱ्यांसाठी आपले योगदान?, महिला वर्गासाठी योगदान?, व्यवसाय वृद्धीसाठी MIDSC चे काय?, कोरोना काळात आपले योगदान काय? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले असून शेवटी मग आपण कोणाला मतदान करायचे? असा सवाल करण्यात आला आहे.

आठवतंय का? च्या बॅनरचीही जोरदार चर्चा

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार असलेल्या पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात दोन बॅनर लावण्यात आले आहेत. त्याचीही चांगलीच चर्चा सुरु आहे. आठतंय का? असे मोठे टायटलच्या बॅनरवर काही मुद्दे टाकण्यात आले असून त्यामध्ये आठवतेय ना भिडे गुरुजींचा कोणी अपमान केला होता!, आठवतंय का? गायब झालेला विकास निधी!, आठवतय का स्टेडियमची निधी कोणी आणला?, खराबपाण्यामुळे आरोग्य आलंय धोक्यात… आठवतंय का? असे प्रश्न बॅनरद्वारे विचारण्यात आले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण हॅटट्रिक करणार?

पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी कराड दक्षिणमधून निवडणूक लढवली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यांच्यापूर्वी मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर 2009 मध्ये विलासकाका उंडाळकर हे कराड दक्षिणमधून विजयी झाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील पृथ्वीराज चव्हाण अतुल भोसले यांचा पराभव करुन पुन्हा एकदा आमदार बनले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण पुन्हा रिंगणात असणार आहेत, त्यांच्यासमोर भाजपच्या अतुल भोसले यांचं आव्हान असेल. सध्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात केल्या जात असलेल्या बॅनरबाजीची आणि डॉ. भोसलेंनी मंजूर करून आणलेल्या विकास कामांच्या बॅनरची चर्चा होत आहे.