कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये जन माहिती अधिकारी फलक लावले नसल्याचे दिसून आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते विश्वास मोहिते यांनी पत्रव्यवहार करीत ग्रामपंचायत कार्यालयात जन माहिती अधिकारी आणि नागरिकांची सनदचे फलक लावण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्याचे पालन करत सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात जन माहिती अधिकारी आणि नागरिकांची सनद हे फलक झळकणार आहेत.
माहिती अधिकार कायदा २००५ च्या अनुषंगाने शासनाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या प्रत्येक कार्यालयाने त्यांच्या कार्यालयाच्या दर्शनी भागात माहितीचा अधिकारी आणि आपिलिय अधिकारी तसेच नागरिकांची सनद हे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी राज्य शासनाच्या विविध विभागाने केली. मात्र, काही ग्रामपंचायतीने याची अंमलबजावणी केलेली नव्हती.
ही गोष्ट कराड तालुक्यातील पाडळी (केसे) येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास मोहिते यांच्या निदर्शनास आली. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी रीतसर पत्रव्यवहार केला. जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा परिषदेच्या मुख्य अधिकारी नागराजन यांना पत्र व्यवहार करून पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील ज्या ज्या तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारचे फळत व सनद लावलेली नाही त्या ग्रामपंचायतींना गटविकास अधिकाऱ्याकडून सूचना करण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानंतर सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत नागरिकांची सनद, जनमाहिती अधिकारी आणि अपीली अधिकारी आशयाचे फलक लावण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून कर्तव्यदक्षपणा : विश्वास मोहिते
जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण केलेल्या मागणीची त्यांनी दखल घेत जिल्हा प्रिसद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना दिल्या. आणि त्याच्या सूचनेनंतर प्रत्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये जन माहिती अधिकारी आणि नागरिकांची सनद लावण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो, असे सामाजिक कार्यकर्ते विश्वास मोहिते यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
नागरिकांची सनद काय आहे?
नागरिकांची सनद हे प्राथमिक साधनांपैकी एक आहे जे सरकारी एजन्सी त्यांच्या नागरिकांना किंवा ग्राहकांना सरकारी सेवांच्या वितरणासाठी त्यांच्या सेवा मानकांशी संवाद साधण्यासाठी वापरतात, याला नागरिकांची सनद असे म्हंटले जाते.