सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो असे सांगून एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे नेमणुकीस असलेल्या अपर पोलीस अधीक्षकास अटक करण्यात आली आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी, कोल्हापूर यांच्याकडे तपासास असलेल्या प्रकरणाचा वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. महाबळेश्वर येथील मेघदुत हॉटेलचे मालक यांना मद्य विक्री परवाना मिळवून देतो, असे सांगून आरोपी श्रीकांत कोल्हापूरे याचे मित्र हणमंत मुंढे व इतर साथीदारांच्या मदतीने हॉटेल मालक यांचा विश्वास संपादन करून २ कोटी ५० लाख रुपये खर्च येणार, असे सांगत त्यांच्याकडून १ कोटी ५ लाख रुपये रोखीने व चेकव्दारे घेऊन हॉटेल मालकाची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हॉटेल मालकाने अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. अर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी तपास करून गुन्ह्याचे स्वरुप निष्पन्न झाल्यावर ९ जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यापुर्वी हणमंत विष्णुदास मुंडे, अभिमन्यू रामदास देडगे व बाळू बाबासाहेब पुरी यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश माळी, पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा कावडे, पोलीस अंमलदार विजय कुंभार, निवृत्ती पाडेकर, चालक जमीर मुल्ला व स्वप्नील जाधव यांनी आरोपीस ठाणे येथे ताब्यात घेऊन अटक केली. वाई न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे व पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्रीमती मनिषा दुबुले तपास करीत आहेत.