कराड प्रतिनिधी । महायुती सरकारमधील लाडक्या भावांनी आपल्या ‘लाडकी बहीण’सारखी कल्याणकारी योजना राबवली. परंतु, ही योजना बंद पाडण्यासाठी त्याच बहिणींचे सावत्र भाऊ कोर्टात गेले. तसेच सावत्र बहिणींनीही या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे धादांत खोटे सांगत महिलांना पैशांची लाच देऊ नका, अशी भाषा वापरली. आया बहिणींचा आधार काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा सावत्र भाऊ आणि बहिणींना या निवडणुकीत जागा दाखवा, अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रियाताई सुळे आणि प्रणितीताई शिंदे यांच्यावर केली.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यातील ओंड येथे शनिवारी महिला मेळावा पार पडला. यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तराताई भोसले, भाजप सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सुरभीताई भोसले, गौरवीताई भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कविता कचरे, सारिका गावडे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी चित्राताई वाघ म्हणाल्या की, गोरगरीब, आदिवासींचे आरक्षण काढून घेण्यात येणार असल्याची भीती घातली. मात्र, मातृशक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केलेल्या बाबासाहेबांचे संविधान सूर्य चंद्र असेपर्यंत कोणीही हटवू शकणार नाही. देशात 70 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने महिलांसाठी काय केले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच मोदींनी सार्वजनिक शौचालय, उज्वला योजना, जनधन योजना, मोफत धान्य, महिलांना 50 टक्के सवलतीत एसटी प्रवास, लखपती दीदी योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत.
यावेळी डॉ. अतुल भोसले म्हणाले, अडीच वर्षांत महाविकास आघाडीने महिलांसाठी एकही चांगली योजना आणली नाही. याउलट महायुतीने महिलांना सन्मान देण्याचे काम केले. लाडकी बहीण योजनेला येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीचा जुमला असल्याचे म्हटले. तसेच या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे अधिवेशनात सांगत दुसरीकडे ही योजना आमची असल्याचाही दावाही त्यांनी केला. मग ते मुख्यमंत्री असताना पावणेचार वर्षांत महिलांच्या खात्यावर एकही पैसा आला का? अशा योजनांबाबत कधी ब्र शब्दही काढला का? असा सवाल डॉ. भोसले यांनी उपस्थित केला.