सातारा प्रतिनिधी । सातारा येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने काल महिला दिनानिमित्त ‘महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी “जेव्हापासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, हे माहिती झाले, तेव्हापासून राज्यातील मोठ्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडले आहे,” अशी टीका खा. सुळे यांच्यावर केली तर “उदयनराजेंना उमेदवारी मिळावी, ही साताऱ्यातील सर्व भगिनींची इच्छा असून, त्यांच्या भावना आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचविणार असल्याचे” महत्वाचे विधान उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत वाघ यांनी केले.
साताऱ्यात पार पडलेल्या महिला मेळाव्यानंतर वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मेळावा अप्रतिम झाला. उदयनराजे यांनी या ठिकाणी महिला मेळाव्याचे आयोजन केले, पण ते आज या ठिकाणी उपस्थित नाहीत. आज उदयनराजे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला आमच्या पक्षाचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. मला वाटते हा मोठा दुग्धशर्करासारखे योग आहे. उदयनराजे भोसले या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. महाराजांच्या या कार्यक्रमांमध्ये मोठ्या भावाची जी कमी होती ती छोट्या भावाने त्या ठिकाणी भरून काढली, याचा मला मनापासून आनंद झालेला आहे.
२०१४ पासून आजपर्यंत या देशातील महिलांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी तिच्या जन्मापासून ते सरणापर्यंत मोदीजी तिच्यासोबत उभे राहिले आहेत. आपल्या मोठ्या ताई या सुद्धा मोदीजींच्या लाभार्थी आहेत. त्यांनी कोरोनाचे वॅक्सिन घेतले नसते तर काय झाले असते. म्हणजे मोदीजींनी आपल्या विरोधकांनाही जीवनदान दिले आहे. लस घ्या आणि माझ्यावर टीका करा. हे काम आपल्या मोठ्या ताई करत असल्याचे वाघ यांनी म्हंटले.