कराड प्रतिनिधी | समाजात अजूनही बालविवाह लावण्याच्या प्रथा सुरूच असल्याचे दिसून येत आहे. अशीच घटना कराड तालुक्यात घडली. कराड तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यावरून मुलीचे आई, वडील, पती, सासू, सासरे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एक अल्पवयीन मुलगी कुटुंबासह तालुक्यातील एका गावात राहते. १२ जून २०२५ रोजी तिला ‘तिच्या आई-वडिलांनी तुला पाहुणे बघायला येणार आहेत,’ असे सांगत आपण आता फक्त साखरपुडा करायचा आहे, असे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील एका गावातील कुटुंब मुलीला पाहण्यासाठी आले. साखरपुडा करायचा म्हणून थेट लग्नाची तयारी सुरू झाली.
मुलीच्या लक्षात आल्यावर तिने माझे लग्नाचे वय नाही, म्हणत स्पष्ट नकार दिला असता तिच्या आई-वडिलांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुलीच्या परवानगीशिवाय तिचे लग्न करून तिला सासरी पाठवले. अखेर तिने तेथून पळ काढत कराड तालुका पोलिस ठाणेमध्ये धाव घेतली. तिने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या आई-वडिलांसह पती, सासू, सासरे, पुरोहितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.