सातारा प्रतिनिधी | राज्यात सत्तास्थापनेसाठी घडामोडी वेगाने सुरु आहेत. याच दरम्यान, काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी दाखल झालेत. दरम्यान, त्यांनी कोणाहीशी संवाद साधला नसून त्यांची तब्येत अचानक बिघडली आहे. या कारणामुळे त्यांनी आजच्या सर्वांच्या भेटी रद्द करण्यात आल्या आहेत. दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली असून त्यांच्याकडून शिंदे यांच्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान, शिंदे यांच्या शरीराचे तापमान हे १०४° आहे.
सध्या एकनाथ शिंदे त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब या गावी आहेत. ते काल शुक्रवारी अचानक हेलिकॉप्टरने गावी दाखल झाले होते. एकीकडे राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या असतानाही त्यांनी गावी येऊन विश्रांती घेण्याचे पसंद केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघेही गुरुवारी रात्री दिल्ली येथे गेले होते. गृहमंत्री अमित शहा यांची या नेत्यांनी भेट घेऊन सत्तास्थापनेच्या अनुषंगाने चर्चा केली होती. मुंबई येथे शुक्रवारी महायुतीची संयुक्त बैठक होणार होती. मात्र, या बैठकीकडे पाठ फिरवत एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हेलिकॉप्टरने त्यांच्या दरे गावी दाखल झाले. त्यांच्यासमवेत त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते. शिंदे सध्या त्यांच्या गावातील निवासस्थानी आहेत. त्यांनी कुणाचीही भेट घेणे टाळले आहे. ते रविवारी दुपारी हेलिकॉप्टरने मुंबईकडे पुन्हा रवाना होणार आहेत.
दीपक केसरकर माघारी गेले…
शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले. दरम्यान केसरकर मुंबईला रवाना झाले.
एकनाथ शिंदे नाराज?
दरम्यान, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगितले जात आहे. आता मुख्यमंत्री पद नसल्याने नाराज उपमुख्यमंत्री पद शिंदे स्वीकारणार का? हे पहावे लागणार आहे.