सातारा प्रतिनिधी । पुणे येथील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकारनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधाकडून सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील राज्य आपत्ती निवारण विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यातील दरे गावात नुकतेच दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे पुढील आजपासून तीन दिवसांसाठी त्याच्या गावी मुक्कामी असणार आहेत. दरम्यान, तीन दिवसांच्या मुक्कामी असले तरी उद्या बुधवारी (दि.२९) रोजी ते काही तासांसाठी बुलढाण्याला रवाना होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत मान्सुनपूर्व बैठकीत राज्यातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले. दरम्यान सातारा दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंनी SDRF च्या आठ टीम आहेत त्यांची संख्या वाढवावी, TDRF च्या धर्तीवर महापालिकांनी टीम सुरु कराव्यात, विभागनिहाय SDRF च्या टीम तयार कराव्यात, दुर्घटना घडल्यानंतर बचावकामी स्थानिक तरूण ताबडतोब जातात त्यांना प्रशिक्षण आणि आवश्यक साहित्य द्यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
एकनाथ शिंदेंचे गाव कुठे आहे?
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून ७० किलोमीटरवर असलेल्या, कोयना नदीच्या काठावर असलेल्या, दरे गावात अवघी ३० घरे आहेत. गावाच्या एका बाजूला जंगल आहे तर दुसऱ्या बाजूला कोयनेचे धरणक्षेत्र आहे. गावातील अधिकांश घरांचे दरवाजे कुलुपबंद आहेत. या ठिकाणी राहणारे बहुतांशी मजूर आहेत. गावात उत्पन्नाचा काही ठोस स्रोत नसल्याने त्यांना मुंबई किंवा पुणे गाठावे लागते.