छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ‘या’ दिवशी येणार साताऱ्यात; 1 वर्षे राहणार संग्रहालयात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा ज्या वाघनखांनी बाहेर काढला होता ती वाघनखं प्रत्यक्ष पाहण्याची संधी आता सातारकरांना मिळणार आहे. ही ऐतिहासिक वाघनखे नोव्हेंबरमध्ये लंडनच्या म्युझियममधून भारतात आणण्यात येणार आहेत. ही वाघनखे 3 वर्षे आपल्या देशात राहणार असून पहिल्यांदा दि. 17 नोव्हेंबर रोजी साताऱ्यात येणार आहेत. सातारा येथे ती वर्षभर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं कोल्हापूर व नागपूर येथेही इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी ती उपलब्ध होणार आहेत. साताऱ्यात वाघनखे येणार असल्याने येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या वतीने वेगाने तयारी सुरू करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यांच्या सहाय्याने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती ऐतिहासिक वाघनखे मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या सातारा नगरीत तमाम सातारकरांना पाहता येणार आहेत. शिवशस्त्रशौर्य असे या प्रदर्शनाला नाव देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित तलवार व वाघनखे ही इंग्रजांनी भारतातून इंग्लंडला नेली होती. त्यामधील भवानी तलवार सेंट जेम्स पॅलेसमध्ये रॉयल कलेक्शनचा भाग आहे. वाघनखे उत्कृष्ट पोलादापासून बनवली असून, अतिशय प्रमाणबद्ध आहेत. एक पट्टी त्यावर खालच्या बाजूस बसवलेल्या चार नख्या आणि वरच्या बाजूस अंगठा असे या वाघनखांचे स्वरूप आहे. ही वाघनखे डाव्या हाताची असल्यामुळे त्यातील लहान अंगठी करंगळीत तर मोठी अंगठी तर्जनीच्या बोटात जाते मग चार नखे चार बोटांच्या बरोबर खाली येतात अगदी वाघाच्या पंजाप्रमाणे हे सर्वात लहान व सर्वात प्रभावी गुप्त शस्त्र आहे.