लंडनच्या म्युझियममधील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखांचं साताऱ्यात ‘या’ दिवशी होणार आगमन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष व सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. येत्या १९ जुलैला वाघनखांचे साताऱ्यात आगमन होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

वाघनखांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, तसेच अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

लंडनच्या व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील वाघनखं राज्य सरकार भारतात आणत आहे. यासाठी ब्रिटन सरकार आणि राज्य सरकार यांच्यात तीन वर्षांचा करार झाला असून, त्यापोटी राज्य सरकार ब्रिटन सरकारला भाडे देणार आहे. ही वाघनखे येत्या १९ जुलैला साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.

पहिल्यांदा संग्रहालय परिसरात वाघनखांचे स्वागत व त्यानंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम होणार आहे. वाघनखांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर संग्रहालय परिसरात स्वच्छता तसेच तेथील अतिक्रमणेही हटविण्यात आली आहेत.