सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे हि लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात होती. हि वाघनखे विशेष विमानाने आज सकाळी मुंबईत आणण्यात आली. हि वाघनखे सातारा उद्या गुरुवारी येणार होती. मात्र, आज सायंकाळीच वाघनखे हि साताऱ्यात कडक पोलीस बंदोबस्तात आणण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखे ठेवण्यात आलेली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त सातारा येथील श्री छत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात इंग्लंड मधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून आणलेली वाघनखे, शिवभक्तांना दर्शनासाठी दि. 19 जुलैपासून उपलब्ध होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत संभाजीराजे छत्रपती व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शस्त्र प्रदर्शन उद्घाटन सोहळा होणार आहे.
पुढील सात महिने हे प्रदर्शन शिवभक्तांसाठी खुले राहणार असून, मोठ्या संख्येने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील व आसपासच्या शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना हे शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व स्थानिक प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले असून हे प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत असून नागरिकांना अल्प दरात हे प्रदर्शन पाहता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.