सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे हि लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात होती. हि वाघनखे विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार होती. ही वाघनखे मुंबईत सकाळी दाखल झाली असून सातारा येथे दि. 18 जुलै 2024 रोजी प्रदर्शनासाठी ठेवण्यात होणार आहेत. दरम्यान, आज रात्रीपर्यंत वाघनखे साताऱ्यात दाखल होणार आहेत. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झाले असून हा सोहळा अत्यंत दिमाखदार व राजेशाही थाटात व्हावा, याची तयारी सुरू झाली आहे.
लंडनच्या म्युझियम मधून येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल होत आहेत. या वाघनखांच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी हा एक शाही स्वागत सोहळा व्हावा, यासाठी झांज पथक, ढोल पथक ,ताशे, स्वागत सोहळ्यासाठी संपूर्ण शहर व जिल्हाभर स्वागत कमानी उभारण्यात येत आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ही शाहुनगरीत आणली जाणार असल्याने याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री देसाईंसह अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी वाघनखे ठेवली जाणार आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयत जाऊन दालनांची पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना आवश्यकत्या सूचना देखील केल्या.
साताऱ्यात ‘इतके’ दिवस पाहता येणार वाघनखे
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार असून जनतेला त्याचे दर्शन घेता येईल. या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा आयोजित केला आहे. एकूण ७ महिने ही वाघनखे शिवाजी महाराज संग्रहालयात असणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला या वाघनखांचे दर्शन घेण्याची संधी मिळावी यासाठी नेटके नियोजन प्रशासनाने केले आहे.
दिमाखात होणार वाघनखांचं स्वागत
ऐतिहासिक अशा वाघनखांच्या स्वागत सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या स्वागत सोहळ्यासाठी संपूर्ण शहर व जिल्हाभर स्वागत कमानी उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तसेच संग्रहालयाची सजावट, विद्युत रोषणाई देखील करण्यात येत आहे.
संग्रालयात ‘या’ ठिकाणी ठेवली जाणार वाघनखे
व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम, लंडन येथून मुंबईत दाखल झालेली वाघनखे ही शिवकालीन वाघनखे संग्रहालयातील दालन क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात येणार आहेत. वाघनखाच्या संरक्षणाकरीता सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सार त्याचप्रमाणे संरक्षण यंत्रणेमार्फत बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे.
वाघनखे पाहण्यासाठी द्यावा लागणार ‘इतका’ शुल्क
दररोज सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी 2 शाळेच्या विद्यार्थ्यांना वाघनखे पाहण्यास निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. इतर प्रेक्षकांना दहा रुपयांप्रमाणे तिकीट आकारण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 5 या वेळेत वाघनखे पाहण्यास खुले राहणार आहे.